रुग्णांच्या जेवणासाठी कसरत
कस्तुरबा रुग्णालयात सिलिंडर तुटवड्यातही सेवा सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंधन तुटवड्याचे पडसाद शहरातील रुग्णालयांपर्यंत पोहोचले असतानाही कस्तुरबा रुग्णालयाच्या कँटीनने (उपहारगृह) रुग्णांच्या जेवणात खंड पडू दिलेला नाही. दररोज सात ते आठ गॅस सिलिंडरची गरज असताना प्रत्यक्षात चार ते पाच सिलिंडरवरच काम भागवावे लागत असूनही सुमारे अडीच हजार रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिकांसाठी वेळेवर जेवण पुरवण्याची कसरत सुरू आहे.
सिलिंडर कमी मिळत असल्याने कँटीनमध्ये पर्यायी उपायांचा अवलंब करावा लागत आहे. काही पदार्थांसाठी पाणी गरम करण्यासाठी हिटरचा वापर केला जात असून यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सिलिंडर पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने सोमवारी परिस्थिती बिकट झाली होती. तरीही मेनूमध्ये कपात न करता नाश्ता आणि जेवण वेळेवर देण्यात आले. मात्र रोजच्या मोठ्या प्रमाणातील स्वयंपाकामुळे कोळसा किंवा चुलीचा पर्याय शक्य नसल्याचे कँटीन व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. रुग्णालयातील जेवणाचे काटेकोर वेळापत्रक पाळले जात असून, सकाळी चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळचा अल्पोपाहार आणि रात्रीचे जेवण नियमित दिले जाते. या पार्श्वभूमीवर कँटीन कर्मचाऱ्यांची धडपड विशेष लक्षवेधी ठरत आहे.
..
सर्वतोपरी प्रयत्न
कँटीन व्यवस्थापक अतिश शिवशरण म्हणाले, ‘सिलिंडर कमी मिळत असले तरी रुग्णांच्या जेवणावर परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. कधी हिटरचा वापर, कधी वेळेचे नियोजन अशा उपायांनी परिस्थिती हाताळत आहोत. रुग्णांना वेळेवर आणि पूर्ण जेवण मिळणे हीच आमची प्राथमिकता आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.