तंत्रशिक्षण संस्थांत सौरऊर्जा प्रकल्पांसाठी करार
मुंबई, ता. २५ : राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी तंत्रशिक्षण संचालनालय आणि महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रीत) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित हाेते. या करारानुसार सौरऊर्जा, स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, ऊर्जा साठवण तसेच ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानांचा वापर करून हरित ऊर्जेवर भर देण्यात येणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने तसेच इतर शासकीय संस्थांच्या इमारतींच्या छतांवर व मोकळ्या जागांवर सौरऊर्जा संयंत्रे उभारण्यात येणार आहेत.