पोलिस असल्याचे भासवून खंडणी उकळणारी संघटित टोळी गजाआड
निवृत्त पोलिस, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकारासह सहा जणांना बेड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पोलिस असल्याचे भासवून व्यावसायिक, उद्योजकांना खोट्या गुन्ह्यात अडवण्याची धमकी देत लुटणाऱ्या, खंडणी उकळणाऱ्या एका संघटित गुन्हेगारी टोळीला आरे पोलिसांनी अलीकडेच अटक केली. या टोळीचा सूत्रधार अद्याप फरार असला तरी टोळीतील सहा जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यात एका निवृत्त पोलिस अंमलदारासह पत्रकार, सामाजिक कार्यकर्तीचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या टोळीने फेब्रुवारी महिन्यात पश्चिम उपनगरात राहणाऱ्या आणि टॅरो कार्डद्वारे भविष्य सांगणाऱ्या महिलेस लक्ष्य केले. टोळीने या महिलेस फोनवर संपर्क साधून १५ फेब्रुवारीला रॉयल पाम येथील एका बंगल्यात बोलावले. तेथे तीन पुरुष आणि दोन महिला उपस्थित होत्या. या सर्वांनी भविष्य सांगण्यासाठी आलेल्या महिलेस पोलिस असल्याचे भासवून काही काळ बंदी बनवले. तिच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि देहविक्री व्यवसायाचे आरोप केले.
या बंगल्यात पांढरी भुकटी असलेल्या दोन पिशव्याही होत्या. टोळीने या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी पाच लाखांची मागणी महिलेकडे केली. महिलेने पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेतली. तेथून सुटताच महिलेने त्वरित आरे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
हे प्रकरण गांभीर्याने घेत उपआयुक्त महेश चिमटे, सहाय्यक आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. खंडणीतील काही रक्कम महिलेने एका खात्यावर जमा केली होती. त्या खात्याचे तपशील मिळवत खातेधारक फरहान कादरी यास अटक करण्यात आली.
चौकशीत फरहानने ही रक्कम नातेवाईक अहमद याच्या सांगण्यावरून खात्यावर जमा करून घेतल्याचे सांगितले. पथकाने अहमद याची पार्श्वभूमी तपासली असता त्याच्याविरोधात मुंबईसह महानगर प्रदेशात फसवणूक व खंडणीचे अनेक गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले. फरहानच्या चौकशीतून तक्रारदार महिलेकडून खंडणी उकळणाऱ्या अन्य पाच आरोपींची ओळख पटवून त्यांनाही अटक करण्यात आली. स्वप्नाली नाडेकर (३८), कविता यादव (४०), राहुल कांबळी (४१), प्रदीप पाठक (३६) आणि एरिक वेगास (६०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील वेगास निवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आहेत. कविता दहिसर येथील रावळपाडा परिसरात नशामुकती केंद्र चालवते. तिच्याविरोधातही खंडणीचे गुन्हे नोंद आहेत. पाठक पत्रकार असून, नाडेकर सामाजिक कार्यकर्ती आहे.
या टोळीचा सूत्रधार अहमद असून, त्यानेच या सर्वांना एकत्र आणल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. त्याच्या अटकेनंतर अन्य गुन्हेही उघडकीस येतील, असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.