पहिली ई-इंजिन चाचणी यशस्वी
जेएनपीटी ते सफाळे अंतर ५ तास २२ मिनिटांत पूर्ण ए
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : देशातील महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर (डब्ल्यूडीएफसी) नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गावर सोमवारी (ता. ३०) पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे भविष्यात मालवाहतुकीचा वेग वाढण्यासह प्रवासी मार्गांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही चाचणी जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल (जेएनपीटी) येथील न्यू डीएफसी यार्डपासून पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्थानकापर्यंत घेण्यात आली. इलेक्ट्रिक इंजिन क्रमांक ६०१६६ दुपारी १:५८ वाजता जेएनपीटी येथून रवाना झाले आणि सायंकाळी ७:२० वाजता सफाळे येथे दाखल झाले. या प्रवासात इंजिनने सुमारे १०६ किलोमीटरचे अंतर ५ तास २२ मिनिटांत पूर्ण केले. डब्ल्यूडीएफसीवरील इलेक्ट्रिक इंजिनची ही यशस्वी चाचणी प्रकल्पाच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर बंदरांमधून देशाच्या विविध भागांत मालवाहतूक अधिक वेगाने करता येणार आहे. विशेषतः जेएनपीटीसारख्या देशातील प्रमुख बंदरातून कंटेनर वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे.
...
प्रवासी वाहतुकीला दिलासा
या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे सध्या प्रवासी आणि मालगाड्या एकाच मार्गावर धावत असल्याने निर्माण होणारी गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासी गाड्यांची वेळेची अचूकता सुधारण्यासही मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, या चाचणीदरम्यान वीजपुरवठा व्यवस्था, सिग्नल प्रणाली, ट्रॅकची क्षमता तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. पुढील टप्प्यात आणखी चाचण्या घेऊन हा मार्ग नियमित मालवाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...
प्रकल्पाची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये
डब्ल्यूडीएफसी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट मालवाहतुकीसाठी वेगवान आणि उच्च क्षमतेची रेल्वे वाहतूक व्यवस्था निर्माण करणे आहे. यामुळे केवळ मालवाहतुकीचा खर्च कमी होणार नाही, तर भारतातील उद्योग क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढून आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे. जेएनपीटी ते वैतरणा हा विभाग सुमारे १०३ किमी लांबीचा असून, तो खारबाव, तळोजा आणि जेएनपीटी या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार आहे. या विभागात ५३ मोठे पूल, २४२ लहान पूल, ३ यार्ड/स्थानके, १० रोड ओव्हर ब्रिज, ९ रोड अंडर ब्रिज तसेच सुमारे १.१७ किमी लांबीचे बोगदे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.