उपजीविकेवर गदा
रेल्वेतील कंत्राटी फेरीवाल्यांमुळे आदिवासींवर संकट
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : लोकलमध्ये कंत्राटी फेरीवाल्यांच्या नियुक्तीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे प्रवासी सुरक्षेबरोबर अनेक दशकांपासून रानमेवा विकणाऱ्या आदिवासींच्या उपजीविकेवर गदा येण्याची भीती आहे.
कसारा, कर्जत, इगतपुरी, पालघर आदिवासी पट्ट्यातील अनेक कुटुंबे लोकल, मेल गाड्यांमध्ये हंगामी फळांच्या विक्रीतून संसार चालवतात. मुंबई लोकल त्यांच्यासाठी प्रवासाचे साधन नसून रोजगाराची जीवनवाहिनी राहिली आहे. विशेषतः आदिवासी भागातील महिला, वृद्ध लोक जंगलातून गोळा केलेला रानमेवा टोपल्यांमध्ये भरून मुंबईसह उपनगरांमध्ये विक्रीसाठी आणतात. दिवसभराच्या विक्रीतून मिळणाऱ्या २०० ते ५०० रुपयांवर त्यांचा संसार चालतो. या विक्रेत्यांकडे अधिकृत परवाने नसले तरी ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे; पण कंत्राटी फेरीवाल्यांना परवानगी दिल्यास पारंपरिक विक्रेत्यांना लोकलमधील प्रवेश बंद होईल, अशी भीती आहे.
------------------------------------
मुंबईकर रानमेव्याला मुकणार
मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या अनेकांसाठी करवंद, जांभूळ किंवा मीठ-मिरची लावलेली जंगली बोरे केवळ फळे नाहीत, तर त्यांच्या बालपणाच्या आठवणींचा एक भाग आहेत. उन्हाळा सुरू झाला लोकलमध्ये घुमणाऱ्या ‘करवंद घ्या... जांभूळ घ्या...,’ हाका मुंबईच्या लोकल संस्कृतीचा भाग होत्या; मात्र आता कंत्राटी विक्रेत्यांच्या आगमनानंतर पारंपरिक रानमेवा लोकलमधून हळूहळू गायब होण्याची भीती व्यक्त होत आहे.
------------------------------
पारंपरिक व्यवसाय अडचणीत
ग्रामीण, आदिवासी भागातील अनेक कुटुंबे एप्रिल-मे मध्ये जंगलातून रानमेवा गोळा करून मुंबईत विक्रीसाठी आणतात. पूर्वी अनेक विक्रेते लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्ये फिरून हा माल विकत होते; मात्र रेल्वे पोलिसांच्या कारवाईच्या भीतीमुळे स्थानकाबाहेर बसून कवडीमोल दरात हा रानमेवा विकत आहेत.
------------------------------
रोजगाराचा पर्याय हिरावणार
रेल्वेच्या दृष्टीने अनधिकृत विक्री रोखणे महत्त्वाचे असले तरी सामाजिक वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आदिवासी भागातील अनेक कुटुंबांसाठी विक्रीच रोजगाराचा पर्याय आहे. कंत्राटी व्यवस्थेमुळे मोठ्या विक्रेत्यांना संधी मिळेल; मात्र अनेक वर्षांपासून लोकलशी जोडलेले छोटे पारंपरिक विक्रेते स्पर्धेत हरवण्याची भीती आहे.
-----------------------------
लोकलमध्ये रोजचे ग्राहक होते. आता बाहेर बसल्यामुळे संपर्क तुटला. रेल्वेने कंत्राटी फेरीवाल्यांसोबत छोट्या विक्रेत्यांचाही विचार करावा.
- मीरा मिरके, आदिवासी विक्रेती, कसारा
....
दिवसभर जंगलात फिरून फळे गोळा करतो. मुंबईकरांना आमचा रानमेवा आवडतो. आधी लोकलमध्ये सगळा माल संपायचा. आता स्थानकाबाहेर बसल्यामुळे विक्रीची खात्री नाही. कंत्राटी फेरीवाले आले तर नुकसान होईल.
- सुमन जुगरे, आदिवासी विक्रेती, कसारा
....
लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्ये करवंद, जांभूळ, रानमेवा विकायचो; पण रेल्वे पोलिसांच्या कारवाईमुळे गाड्यांमध्ये विक्री बंद झाली. आता कंत्राटी फेरीवाले आले तर पारंपरिक विक्रेत्यांना संधीच मिळणार नाही.
- सोनी हरपडे, आदिवासी महिला, खर्डी (कसारा)
....
ग्राफिक्स -
जंगलातून मुंबईपर्यंतचा प्रवास
- पहाटे ४ ते ६ : जंगलातून करवंद, जांभूळ, रानमेवा गोळा
- सकाळी ७ ते ९ : कसारा/कर्जतवरून लोकलने मुंबईकडे प्रवास
- दिवसभर : लोकल किंवा स्थानक परिसरात विक्री
- रोजची कमाई : २०० ते ५००
--------------------
चवीचा हंगामी वारसा
- करवंद (एप्रिल-मे हंगाम)
- जांभूळ (मे-जून हंगाम)
- आंबट बोरे
- खिरणी, चारोळी (चार)
- टेंभरा, चिचबिलाई
- सीताफळ (ऑगस्ट-सप्टेंबर)
- रानआवळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.