केईएमच्या जनशताब्दी टॉवरची उंची वाढवण्याचा प्रस्ताव
आयुक्त अश्विनी भिडे यांची रुग्णालयाला भेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : केईएम रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या जनशताब्दी टॉवरची उंची वाढवण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या क्षमतावाढीसाठी हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी केईएम रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी त्यांनी नोंदणी कक्ष, अतिदक्षता विभाग, अपघात विभाग तसेच सर्वसाधारण कक्षांची पाहणी केली. रुग्णालयात रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. ऑनलाइन प्रणालीचा सर्व्हर बंद झाल्यास ऑफलाइन पद्धतीने सेवा सुरू ठेवण्याची व्यवस्था असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एचएमआयएस’ अंतर्गत रुग्णांची नोंद, वैद्यकीय अहवाल आणि तपासण्यांची माहिती कशी संकलित केली जाते, याची माहिती त्यांनी घेतली. तसेच सर्व विभागांनी या प्रणालीचा प्रभावी वापर करावा आणि डॅशबोर्डचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी या प्रणालीचे एकत्रीकरण अधिक प्रभावीपणे करावे, असेही त्यांनी सांगितले. रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला. नवीन इमारतींमध्ये सर्व वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या अत्याधुनिक तपासण्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. शस्त्रक्रिया विभागात मल्टिस्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रिया सुविधा ‘सीएसआर’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. केईएम रुग्णालयावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उपनगरीय रुग्णालये व दवाखान्यांमध्ये सेवा अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच रुग्ण हस्तांतरणासाठी लिंकेज सिस्टीम मजबूत करण्यावर भर देण्यास सांगितले. या बैठकीला रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.