मोतीलाल नगरवासीयांना ‘१,६००’चे घर
राज्य सरकारची तत्त्वतः मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : गारेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरचा म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ॲण्ड डीए) माध्यमातून पुनर्विकास करणार असून येथील रहिवाशांना तब्बल १,६०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाचे सुसज्ज घर मिळणार आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यानुसार म्हाडाकडून लवकरच राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज दिली.
म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचे (मास्टर प्लान) सादरीकरण आज संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत केले. मुंबई उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी १४३ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सी ॲण्ड डीए म्हणून अदाणी समूहामार्फत साकारण्यात येत आहे. येथील रहिवाशांना १,६०० चौरस फूट बिल्टअप क्षेत्रफळाची घरे दिली जाणार होती; मात्र रहिवाशांकडून सातत्याने वाढीव कार्पेट क्षेत्रफळ असलेली घरे देण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी १,६०० चौरस फूट रेरा कार्पेटची घरे देण्यास मंजुरी दिली असल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट करतानाच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून सरकारला पाठवणार आहे. या वेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे उपस्थित होते.
...
असे होणार लाभ
- राहिवाशांना कार्पेट १,६०० चौरस फुटांची घरे दिल्यास वाढणारा आर्थिक भार म्हाडा आणि विकसकावर टाकला जाईल.
- मोतीलाल नगर एकसाठी सात पुनर्वसन टाॅवर असणार आहेत. त्यामध्ये एक बेसमेंट, चार पोडियम आणि ४४ मजली इमारती असणार आहेत.
- मोतीलाल नगर दोन आणि तीनमध्ये आठ पुनर्वसन टाॅवर असणार आहेत. त्यामध्ये एक बेसमेंट, चार पोडियम आणि ४८ मजली इमारती असणार आहेत.
- १,६०० चौरस फुटांचे मोठे घर नको असेल तर रहिवाशांसमोर ८०० चौरस फुटांची दोन घरे घेण्याचा पर्याय असेल.
...
रहिवाशांच्या मागण्या
मोतीलाल नगरच्या मास्टर प्लानचे आज सायंकाळी म्हाडाने रहिवाशांसमोरही सादरीकरण केले. या वेळी रहिवाशांनी २,४०० चौरस फुटांचे घर आणि ३० लाख रुपये काॅर्पस फंडाची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.