मुक्या जीवांसाठी देवदूत ठरणारे पशुवैद्यक
विविध संस्थांच्या माध्यमातून प्राणी कल्याणाची चळवळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : वाचा फुटली नसली तरी डोळ्यांतून वेदना व्यक्त करणाऱ्या मुक्या जीवांसाठी पशुवैद्यक हे केवळ डॉक्टर नसून देवदूत ठरत आहेत. आजच्या धकाधकीच्या शहरी जीवनात माणूस आणि प्राणी यांच्यातील संवेदनशीलतेचा दुवा सांधण्याचे काम हे पशुवैद्यक अत्यंत निष्ठेने करीत आहेत. उद्या शनिवारी (ता. २५) साजऱ्या होणाऱ्या जागतिक पशुवैद्यक दिनाच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकांच्या कार्याची आठवण करणे आवश्यक आहे.
मुंबईसारख्या महानगरात या डॉक्टरांनी आतापर्यंत हजारो मुक्या प्राण्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. शहरांमध्ये पाळीव प्राणी आता कुटुंबाचा अविभाज्य भाग झाले आहेत. त्यांच्या आरोग्यापासून ते आहारापर्यंतच्या प्रत्येक गरजेत पशुवैद्यक मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. मात्र खरी कसोटी लागते ती रस्त्यावरील भटक्या प्राण्यांच्या बाबतीत. अपघातग्रस्त किंवा गंभीर आजारी भटक्या प्राण्यांना नवजीवन देण्यासाठी मुंबईतील अनेक पशुवैद्यक अहोरात्र झटत आहेत.
भांडुप येथील डॉ. राहुल मेश्राम हे लहान आणि दुर्मिळ प्राण्यांवर उपचार करीत आहेत. अम्मा केअर फाउंडेशन आणि पॉज-मुंबई यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून ते संकटकाळी सदैव तत्पर असतात.
मिरा रोड येथील डॉ. मार्गज पेट क्लिनिकचे संचालक डॉ. राजेंद्रकुमार मार्गज हे गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या प्राण्यांसाठी आशेचा किरण ठरले आहेत. व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी प्राणी कल्याणाची मोठी चळवळ उभी केली असून, जखमी प्राण्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात मोठे योगदान दिले आहे.
शहरी भागात चुकून शिरलेल्या वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळवून देण्यात डॉ. मनीष पिंगळे यांचे योगदान अतुलनीय आहे. २००५ पासून त्यांनी हजारो वन्यजीवांना जीवदान दिले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील स्पॉटेड डिअरचे स्थलांतर आणि हजारो कासवांचे पुनर्वसन ही त्यांच्या कार्याची ठळक उदाहरणे आहेत.
डॉक्टरांचे कार्य वंदनीय
मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू यांनी या कार्याचे कौतुक करताना सांगितले, की मुक्या जीवांच्या वेदना ओळखून त्यांना माणुसकीचा आधार देणाऱ्या या डॉक्टरांचे कार्य वंदनीय आहे. मात्र शहराचा विस्तार पाहता इतरही पशुवैद्यकांनी आणि विशेषतः तरुण डॉक्टरांनी या सामाजिक कार्यात मोठ्या संख्येने पुढे येण्याची गरज आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच आपण या मुक्या प्राण्यांचे आयुष्य सुसह्य करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.