एसटी प्रवासी-चालकांचे हाल!
डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, पण राज्य सरकारच्या अर्थ खात्याने परवानगी दिली नसून डिझेलअभावी राज्यातील ५५ आगारातील वाहतूक विस्कळित झाली असून, प्रवासी व चालकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
एसटीला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर इतके डिझेल लागते. इंधनावर वर्षाला सरासरी तीन हजार ४०० कोटी रुपये इतका खर्च होतो. उन्हाळी हंगाम असूनही एसटीच्या प्रवासी उत्पन्नातसुद्धा अपेक्षित वाढ होत नसल्याने व मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी व महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये मूल्यवर्धित कर कमी असल्याने डिझेल स्वस्त असून, महामंडळाच्या फायद्याचा दृष्टीने गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी घेतला होता. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती. पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याची परवानगी मागितली होती, पण अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी त्याला अद्यापी हिरवा कंदील दाखवला नसून पूर्वीची पुरवठादार कंपनी बीपीसीएलचा करार संपल्याने त्यांनी एक महिन्यापासून डिझेल देणे बंद केल्याने, फेऱ्या उशिरा जात आहेत. काही विभागात प्रस्तावित किलोमीटर रद्द होत असल्याने त्याचा परिणाम प्रवासी उत्पन्नावर झाला असून, हंगामी भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. साधारण १५ टक्के प्रवासी उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून, ऐन हंगामात एसटीचे आर्थिक नुकसान झाले आहे.
इंधनासाठी तासन्तास रांगेत
एसटीकडे एकूण २५१ डिझेलपंप असून, त्यातील १९६ आयओसीचे व ५५ बीपीसीएलचे आहेत. बीपीसीएलचे कंत्राट संपल्याने ५५ डिझेलपंप गेले महिनाभर बंद आहेत. ज्या आगारातील पंप बंद आहेत, तिथल्या गाड्यांना दुसऱ्या आगारात डिझेल भरण्यासाठी जावे लागत आहे. ते दूरवर आहेतच, पण तिथे गाड्या वाढल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. गाडी घेऊन चालकांना तासन्तास रांगेत राहून डिझेल भरावे लागत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.