‘अनिर्णित’ धारावीकरांना दिलासा मिळणार
पालिकेने दिलेल्या फोटोपासवरील तारखेचा तिढा सुटणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : वास्तव्याचा सबळ पुरावा म्हणून मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारा फोटोपास (रहिवाशांना देण्यात येणारे वास्तव्याचे ओळखपत्र) सादर करूनही धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पात्रता सर्वेक्षणात ‘अनिर्णित’ श्रेणीत टाकण्यात आलेल्या धारावीकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या वतीने सदनिकांचे सर्वेक्षण १ जानेवारी २००० पूर्वी करण्यात आले असले तरी त्यांना फोटोपास मात्र त्यानंतर वितरित केले असून, त्यावरील तारखेमुळे पात्रतेबाबतचा निर्णय अनिर्णित ठेवला होता. त्यासंदर्भात पालिकेने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) एक पत्र दिले असून, त्यामध्ये अंतिम मुदतीनंतर म्हणजेच २००० नंतर पालिकेच्या वतीने वितरित केलेले फोटोपासदेखील ग्राह्य धरता येतील, असे स्पष्ट केले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण करताना अनेक रहिवाशांकडे २००० नंतरचे फोटोपास असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या पात्रतेचा निर्णय अनिर्णित ठेवला आहे. दरम्यान, पालिकेच्या फोटोपासवरील तारखेच्या तांत्रिक अडचणीमुळे हा संभ्रम निर्माण झाला असल्याचे डीआरपीच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले. यावर तोडगा काढण्यासाठी आता पाऊल उचलण्यात येणार असल्याने हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पालिकेच्या वतीने धारावीमध्ये २००० पूर्वी सर्वेक्षण प्रक्रिया राबविण्यात आली होती. रहिवाशांना सर्वेक्षण पावत्या देण्यात आल्या होत्या. मात्र बहुतेक रहिवाशांनी आपापल्या सोयीनुसार कालांतराने या पावत्यांचे रूपांतर फोटोपासमध्ये केले. त्यामुळे फोटोपास तो ज्या वेळी दिला तेव्हाची तारीख असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.