उष्णतेने पशू-पक्ष्यांचे हाल
परळच्या रुग्णालयावर वाढता ताण; हृदय, यकृत, मूत्रपिंडांवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : महानगरातील वाढत्या उष्णतेचा परिणाम आता फक्त माणसांपुरता मर्यादित न राहता मुक्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवरही गंभीरपणे होत आहे. परळ येथील बाई साकराबाई दिनशाॅ पेटीट रुग्णालय येथे वाढत्या रुग्णसंख्येमुळे वाढता ताण निर्माण झाला असून, रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत सरकारच्या अखत्यारीतील आणखी एक रुग्णालय सुरू करण्याची मागणी इथल्या डाॅक्टरांनी केली आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या ताज्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे ४२ घार, ३५ कबूतर आणि १५ कावळे अशा पक्ष्यांना डिहायड्रेशन व अशक्तपणामुळे उपचारासाठी आणावे लागले. तसेच सुमारे १५ कुत्रे आणि १० मांजरींमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळून आली आहेत.
सध्या दररोज सुमारे २५ कुत्रे आणि ३० ते ३५ मांजरी आंतररुग्ण विभागामध्ये दाखल होत आहेत, तर बाह्यरुग्ण विभागामध्ये ५० ते ६० प्रकरणांची नोंद होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील सर्व वॉर्ड भरले असून, नव्या प्राण्यांना दाखल करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, वेळेवर उपचार न मिळाल्यास उष्माघात जीवघेणा ठरू शकतो. वाढत्या तापमानाचा परिणाम हृदय, यकृत आणि मूत्रपिंडांवर होऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
हवामानातील बदल, पाण्याची कमतरता, सावलीचा अभाव आणि वाढते काँक्रीटीकरण यामुळे शहरातील भटके प्राणी आणि पक्ष्यांची परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पाण्याची सोय करावी. तसेच त्रस्त प्राणी आढळल्यास तत्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा.
रॉ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत उष्णतेचा प्रभावात येऊन उपचार झालेल्या नोंदींमध्ये एकूण ७३ प्रकरणांची नोंद झाली आहे. यामध्ये पक्ष्यांच्या ४४, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १७ आणि सस्तन प्राण्यांच्या १२ प्रकरणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वेळी फ्लेमिंगो पक्ष्याचाही समावेश आहे. या प्राणी आणि पक्ष्यांवर योग्य ते उपचार करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
जास्तीत जास्त निर्जलीकरण आणि उष्माघाताची प्रकरणे सर्वाधिक आहेत. घुबड, पोपट, कोकिळा, घार, बगळा, चिमणी हे पक्षी आढळले आहेत. त्यासोबत, वानर, माकडे, खार हेदेखील उपचारांसाठी आले. सरपटणारे प्राणी, वेगवेगळ्या प्रकरचे साप, कासव आणि सरडा हे प्राणी आढळून आले आहेत, असे शर्मा यांनी सांगितले.
असा होताे त्रास
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मयूर डंगर यांनी सांगितले की, उष्माघाताच्या प्रकरणांमध्ये प्राण्यांचे शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. कुत्र्यांमध्ये तापमान १०२ ते १०४ डिग्रीपर्यंत पोहोचते. ते वेगाने श्वास घेतात, डोळे लाल होतात आणि तोंडातून जास्त लाळ गळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाण्याची कमतरता
उपचारांमध्ये प्रथम प्राण्यांचे शरीर थंड करण्यावर भर दिला जातो. ओल्या कापडाने शरीर झाकून तापमान कमी केले जाते, त्यानंतर सलाइन व मल्टीव्हिटामिनद्वारे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.