आता सिग्नल चुकण्याचा धाेका टळणार
मध्य रेल्वेचे मोटरमनसाठी ‘इलेक्ट्रॉनिक सहपायलट’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई उपनगरी रेल्वेतील सुरक्षित ट्रेन संचालन अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकलमध्ये ‘सीआयएएस’ (सिग्नल लोकेशन अनाउंसमेंट सिस्टीम) प्रणालीत सुधारणा सुरू केली आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे मोटरमनला पुढील सिग्नलची अचूक माहिती ध्वनी संदेशाद्वारे मिळणार असून, सिग्नल चुकण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होणार आहे.
मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वाधिक व्यस्त रेल्वे जाळ्यांपैकी एक मानले जाते. दररोज सुमारे २,३०० हून अधिक लोकल गाड्या स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीअंतर्गत धावतात. अनेक ठिकाणी सिग्नलमधील अंतर केवळ ४०० ते ५०० मीटर इतके आहे. सुमारे ४०० सिग्नल उजव्या, अतिउजव्या, डाव्या किंवा अतिडाव्या बाजूस असल्याने मोटरमनवर मोठा ताण येतो.
मध्य रेल्वेने जीपीएस आधारित ‘सीआयएएस’ प्रणाली अधिक प्रगत केली आहे. या प्रणालीद्वारे ट्रेनच्या प्रत्यक्ष स्थानानुसार पुढील सिग्नलचा क्रमांक आणि त्याचे स्थान मोटरमनला ध्वनी संदेशाद्वारे कळवले जाते. त्यामुळे सिग्नल ओळखणे अधिक सुलभ होणार आहे.
------------------------------------
३५० मीटर आधीच सूचना
- सिग्नलजवळ पोहोचण्यापूर्वी ३५० मीटर आणि २५० मीटर अंतरावर सिग्नल क्रमांक आणि त्याच्या स्थानाची ध्वनी सूचना दिली जाते.
- एखादा ‘पिवळा सिग्नल’ पार केल्यानंतर ‘सावधान, पुढील सिग्नल लाल आहे’ असा सतत ध्वनी इशारा दिला जातो. पुढील सिग्नल हिरवा किंवा डबल पिवळा होईपर्यंत ही सूचना सुरू राहते.
- प्रत्येक मार्गावरील सर्व सिग्नलची ध्वनी नोंद, जीपीएस निर्देशांक आणि स्थानाची माहिती ‘सीआयएएस’ प्रणालीमध्ये आधीपासून नोंदवलेली असते.
- ट्रेन सुरू करण्यापूर्वी ट्रेन मॅनेजर संबंधित मार्गाची निवड करतो. त्यानुसार पुढील स्थानकाची माहितीही ५०० मीटर आणि २५० मीटर आधी जाहीर केली जाते.
---
‘झीरो स्पॅड’च्या दिशेने पाऊल
मध्य रेल्वेनुसार ही प्रणाली मोटरमनसाठी ‘इलेक्ट्रॉनिक सह-पायलट’प्रमाणे काम करणार आहे. त्यामुळे मोटरमनवरील मानसिक ताण कमी होऊन सुरक्षित संचालनाला मदत मिळणार आहे. तसेच वेगमर्यादा, फलाटावरील प्रवेश आणि महत्त्वाच्या सिग्नलजवळ गाडीच्या वेगावर देखरेख ठेवली जाणार आहे. ईएमयू लोकलची प्रत्यक्ष स्थिती आणि वेग नियंत्रण कक्षाला उपलब्ध होणार असल्यामुळे ‘झीरो स्पॅड’ अर्थात सिग्नल ओलांडण्याच्या घटना पूर्णपणे टाळण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.