मुंबईला महाराष्ट्राची ‘पॉवर’
राज्यभरातून ८० टक्के विजेचा पुरवठा
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला राज्यभरातून ‘पॉवर’ मिळत आहे. सध्या वाढलेल्या तापमानामुळे मुंबईत एसी, पंखे, कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने विजेची मागणी ४,५१० मेगावॉट एवढ्या विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. ही विजेची मागणी पूर्ण करण्याची कामगिरी राज्याच्या ग्रामीण भागात असलेल्या वीज केंद्राकडून पार पाडली जात आहे. एकूण विजेच्या मागणीपैकी तब्बल ८० टक्के म्हणजे जवळपास ३,४०० ते ३,५०० मेगावॉट वीज राज्यातून पुरवली जात आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे ४७ लाख वीजग्राहक असून, त्यांना बेस्ट, टाटा पॉवर आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून वीजपुरवठा केला जातो. ही वीज प्रामुख्याने टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील औष्णिक वीज केंद्रातून, खोपोली येथील जलविद्युत केंद्रातून घेतली जाते. तसेच ‘अदाणी’च्या डहाणू येथील वीज केंद्रातूनही वीज उपलब्ध होते. मात्र, सध्या मुंबईत विजेच्या मागणीत मोठी वाढ नोंदली जात आहे. मात्र, टाटाच्या ट्रॉम्बे आणि अदाणीच्या डहाणू वीज केंद्रातील प्रति युनिट विजेचा दर तीन रुपयांहून अधिक आहे, तर राज्यातील वेगवेगळ्या औष्णिक, सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून कमी दराने वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे वीज आयोगाच्या मेरिट डिस्पॅच ऑर्डरनुसार स्वस्त वीज खरेदीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून मुंबईतील वीज केंद्रातून मर्यादित स्वरूपात ९०० ते १००० मेगावॉट वीज घेतली जात असून, उर्वरित ३,५०० मेगावॉट वीज उच्चदाब वीजवाहिन्यांच्या माध्यमातून राज्यभरातून आणली जात असल्याचे राज्य भार प्रेषण केंद्राच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
राज्यातील वीज स्वस्त
राज्य सरकारने अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून खारघर-विक्रोळी आणि आरे-कुडूस या प्रत्येकी १००० मेगावॉट क्षमतेच्या उच्चदाब वीजवाहिन्या उभारल्या आहेत. या माध्यमातून गरजेनुसार २,००० मेगावॉटपर्यंत अतिरिक्त वीज वाहून आणली जात आहे. तसेच याआधीच्या महापारेषणच्या वीजवाहिन्यांद्वारे १,५०० मेगावॉटहून अधिक वीज वाहून आणली जाते. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत राज्याच्या ग्रीडमध्ये स्वस्त वीज उपलब्ध होत असल्याने त्याच्या खरेदीला वीज कंपन्यांकडून प्राधान्य दिले जात आहे.
सध्या मुंबईतील वीज केंद्रांच्या तुलनेत राज्यात औष्णिक आणि सौरऊर्जा प्रकल्पात कमी दराने मुबलक वीज उपलब्ध होत असल्याने मुंबईत जास्तीत जास्त वीज राज्यातून आणली जात आहे. उच्चदाब वीजवाहिन्यांचे नेटवर्क वाढल्याने मुंबईकरांसाठी राज्यातील पर्याय उपलब्ध झाला आहे. - डॉ. अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ
सोमवारी (ता. ११) उपलब्ध झालेली वीज (सरासरी)
- टाटा पॉवर - ६८० मेगावॉट (ट्रॉम्बे - ५६९, खोपोली - १११)
- अदाणी इलेक्ट्रिसिटी (डहाणू) - ४०७ मेगावॉट
- राज्यभरातून घेतलेली वीज - ३,४२२ मेगावॉट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.