पालिकेच्या विकास आराखडाअंतर्गत मेट्रो-२ब साठी वांद्र्यात भूसंपादन
पालिकेच्या नियमामुळे मार्ग मोकळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई मेट्रो-२ब प्रकल्पातील सारस्वत स्थानकाच्या पोचमार्गासाठी वांद्रे (पश्चिम) येथील महत्त्वाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या मंजुरी लाभलेल्या विकास आराखडा-२०३४ मधील विशेष नियमाचा आधार घेत हे संपादन केले जात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने यासंदर्भातील अंतिम अधिसूचना जारी केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या जमिनीसाठी राज्य शासनाकडे अर्ज केला होता. त्यानुसार वांद्रे येथील ४२३.६४ चौरस मीटर जागा मेट्रो प्रकल्पासाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या विकास आराखडा-२०३४ (डीपी-२०३४) मधील नियम क्रमांक ५५ नुसार, मेट्रो, मोनो किंवा कोस्टल रोडसारख्या पायाभूत प्रकल्पांच्या संरेखनात बदल झाल्यास, सुधारित योजनेनुसार ती जमीन विकास आराखड्यात स्वयंचलितपणे आरक्षित होते. याच तरतुदीचा वापर करून, सारस्वत मेट्रो स्टेशनच्या प्रवाशांच्या येण्या-जाण्याच्या सुविधेसाठी ही जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना (एमआरटीपी) अधिनियम, १९६६ च्या कलम १२६ (१) अन्वये एमएमआरडीएने केलेल्या अर्जावर ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या विकास योजनेत आधीच समाविष्ट असलेल्या सार्वजनिक प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या संपादनापोटी द्यावयाची सर्व नुकसान भरपाई एमएमआरडीए पालिकेऐवजी थेट भूधारकांना देणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी तालुक्यांतर्गत मौजे ई-वॉर्ड, बांद्रा (पश्चिम) येथील नगर भूमापन क्रमांकांमधील एकूण ४२३.६४ चौरस मीटर जागा महापालिकेच्या विकास आराखड्यातून मेट्रोकडे हस्तांतरित केली जाणार आहे. यासह इतर लहान भूखंड मिळून एकूण आठ जागा संपादित केल्या जाणार आहेत. या भूसंपादनामुळे मुंबई मेट्रो-२बच्या सारस्वत स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असून, प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा आणि प्रशस्त रस्ता उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.