मुंबई

‘मिशन झिरो स्क्रॅप’मधून मध्य रेल्वेला ७३.६७ कोटींचा महसूल

CD

‘मिशन झीरो स्क्रॅप’मधून मध्य रेल्वेला ७३.६७ कोटींचा महसूल
दोन महिन्यांत विक्रमी कमाई; पुणे विभाग आघाडीवर, परळ कार्यशाळेचीही उल्लेखनीय कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : भंगार साहित्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावत महसूल वाढीचा नवा विक्रम नोंदविण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. ‘मिशन झीरो स्क्रॅप’ उपक्रमांतर्गत एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने ७३.६७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. या उपक्रमामुळे मालमत्ता व्यवस्थापन, कार्यक्षमतेत वाढ आणि शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

रेल्वेच्या विविध विभागांमध्ये जमा होणारे कालबाह्य साहित्य, वापरात नसलेली यंत्रसामग्री, लोखंडी साहित्य, केबल, जुने सुटे भाग आणि अन्य भंगार साहित्याची वेळोवेळी विल्हेवाट लावण्यासाठी मध्य रेल्वेकडून ‘मिशन झीरो स्क्रॅप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे रेल्वेच्या उपलब्ध जागेचा अधिक परिणामकारक वापर होण्यासोबतच अतिरिक्त महसूलही मिळत आहे.

- पुणे विभाग आघाडीवर
यंदा एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या भंगार विक्रीत विभागनिहाय महसुलात पुणे विभागाने १५.६५ कोटी रुपयांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ नागपूर विभागाने ११.७७ कोटी, भुसावळ विभागाने ८.७२ कोटी, मुंबई विभागाने ७.३३ कोटी, तर सोलापूर विभागाने ४.५९ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. विविध विभागांनी कालबाह्य साहित्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावल्यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.

- कार्यशाळांची सरशी
कार्यशाळांच्या कामगिरीतही उल्लेखनीय वाढ दिसून आली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने ११.०५ कोटी रुपयांची, तर माटुंगा कार्यशाळेने ७.३८ कोटी रुपयांची भंगार विक्री केली आहे. या दोन्ही कार्यशाळांनी भंगार साहित्याची तातडीने विल्हेवाट लावत महसूलवाढीस हातभार लावला आहे.

उपलब्ध जागेचा प्रभावी वापर
‘मिशन झीरो स्क्रॅप’ हा केवळ महसूलवाढीचा उपक्रम नसून, संसाधनांचा योग्य वापर, स्वच्छ व सुरक्षित कार्यपरिसर आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यातही रेल्वे परिसर भंगारमुक्त ठेवण्यासाठी आणि उपलब्ध जागेचा प्रभावी वापर करण्यासाठी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे मत रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


एकूण भंगार विक्री महसूल (एप्रिल-मे २०२६)
- ७३.६७ कोटी

विभागनिहाय महसूल

पुणे : १५.६५ कोटी

नागपूर : ११.७७ कोटी

भुसावळ : ८.७२ कोटी

मुंबई : ७.३३ कोटी

सोलापूर : ४.५९ कोटी

कार्यशाळानिहाय महसूल

परळ कार्यशाळा : ११.०५ कोटी

माटुंगा कार्यशाळा : ७.३८ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT