म्हशीचे सुटे दूध नऊ रुपयांनी महागणार
येत्या १ सप्टेंबरपासून नवे दर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महागाईने पोळलेल्या सर्वसामान्यांना आता आणखी एक चटका बसणार आहे. म्हशीच्या सुट्या दुधाच्या दरात १ सप्टेंबरपासून तब्बल नऊ रुपयांची मोठी वाढ होणार आहे, अशी माहिती मुंबई दुग्ध उत्पादक संघटनेने दिली.
मुंबई दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सी. के. सिंग म्हणाले, की दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमती तसेच पशुखाद्याच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुधाचा सध्याचा घाऊक दर प्रतिलिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये करण्यात येणार आहे. मुंबईत हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहेत. जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमतींबरोबरच दाणा, तूरचुणी, चणाचुणी आदी पशुखाद्यांच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच चारा, पेंड आदींच्या किमतीतही वाढ झाल्याने दूध उत्पादकांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगण्यात आले. या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून हा दर प्रतिलिटर नऊ रुपयांनी वाढवून १०२ रुपये करण्यात आला असून, दूध उत्पादकांना वाढत्या खर्चातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई दुग्ध उत्पादक संघाकडून स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.