शताब्दी रुग्णालयाच्या रक्तपेढीवर कारवाई
अन्न व औषध प्रशासनाचे तीन दिवसांच्या निलंबनाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब शताब्दी रुग्णालयातील रक्तपेढीवर अन्न व औषध प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन दिवसांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीन दिवस ही रक्तपेढी बंद राहील, अशी माहिती शताब्दी रुग्णालयातील सूत्रांनी दिली. रक्तपेढी प्रशासनाने या कारवाईविरोधात अपील केल्याचे समजते.
नाव न सांगण्याच्या अटीवर मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीदरम्यान रक्तपेढीतील आवश्यक मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांची पात्रता, नोंदवही तसेच यंत्रसामग्रीच्या देखभालीशी संबंधित काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. रक्तपेढीत आवश्यक संख्येने पात्र तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याची बाबही तपासणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.
या आक्षेपांबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अन्न व औषध प्रशासनाला स्पष्टीकरण देण्यात आले. रक्तपेढीशी संबंधित आवश्यक नोंदी व कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच रक्तपेढीतील यंत्रसामग्रीची देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून, सर्व यंत्रे कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सध्या आपत्कालीन परिस्थितीत रक्त किंवा रक्तघटकांची गरज भासल्यास इतर रक्तपेढ्यांशी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक रक्त उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असल्याचेही सांगण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर रक्तपेढीतील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, पात्र मनुष्यबळ, नोंदवही आणि यंत्रसामग्रीशी संबंधित बाबींची पूर्तता करण्याबरोबरच भविष्यात अधिक आधुनिक रक्तपेढी व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे समोर आले आहे.
पात्र मनुष्यबळाची कमतरता
रक्तपेढीचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी प्रशिक्षित व पात्र तंत्रज्ञांची आवश्यकता असते. मात्र, आवश्यकतेच्या तुलनेत सध्या पात्र तंत्रज्ञांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. रक्तपेढीमध्ये आवश्यक संख्येने तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असले तरी प्रशिक्षित कर्मचारी अधिक चांगल्या वेतनाच्या संधी मिळाल्यानंतर नोकरी सोडत असल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे सांगण्यात आले. तसेच रक्तपेढीत काम करण्यासाठी आवश्यक अनुभव आणि पात्रता पूर्ण केल्यानंतरच संबंधित कर्मचाऱ्यांना मान्यता मिळते. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे हे रुग्णालय प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.
आधुनिक रक्तघटक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव
दरम्यान, सध्याच्या रक्तपेढीत प्रामुख्याने संपूर्ण रक्ताचा वापर होत असला तरी आधुनिक उपचारपद्धतींमध्ये लाल रक्तपेशी, रक्तबिंबिका तसेच इतर रक्तघटकांची अधिक गरज भासते. त्यामुळे रुग्णालयात आधुनिक रक्तघटक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त सहभागातून हे केंद्र उभारण्याचा विचार असून, ही सुविधा सुरू झाल्यास रुग्णांना आवश्यक रक्तघटक रुग्णालयातच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत इतर रक्तपेढ्यांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.