जैन मुनींचा बेमुदत उपाेषणाचा इशारा
मुंबईत कबुतरांचा विषय पुन्हा तापणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील बंद केलेले कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरून शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. जैनमुनी नीलेशचंद्र महाराज यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन कबुतरखाने सुरू न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या मागणीला जोरदार विरोध करून तीव्र आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
आंदोलनादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी कबुतरांना दाणा-पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अजूनही पायधुनीतील श्री गोडी जी पार्श्वनाथ जैन मंदिरासह मुंबईतील कबुतरखाने बंदच असल्याचा आरोप मुनींनी केला. ‘या वेळी आश्वासन ऐकणार नाही. सर्व कबुतरखाने तातडीने उघडले नाहीत, तर पायधुनी येथे बेमुदत उपोषण सुरू करू,’ असा थेट इशारा त्यांनी दिला.
..............
मनसेचा तीव्र विराेध
- मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कायद्याचे राज्य चालले पाहिजे यावर भर देऊन कबुतरांमुळे फुप्फुसांचे आजार होत असल्याने लोकांच्या आरोग्यासाठी ते बंदच राहिले पाहिजेत, अशी भूमिका स्पष्ट केली.
- मनसेच्या मलबार हिल विभागाचे अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी स्थानिक आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र लिहून सार्वजनिक ठिकाणी कबुतरखाने सुरू करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
- ‘कबुतरखाने सुरू करायचेच असतील, तर मरीन लाइन्स येथील जैन जिमखान्याच्या मैदानावर किंवा जैन समाजाच्या इमारतींच्या गच्चीवर करावेत. सार्वजनिक रस्ते, उद्याने किंवा चौकांत दबावाला बळी पडून कबुतरखाने सुरू केल्यास मनसे शैलीत प्रखर विरोध केला जाईल,’ असा इशारा मनसेने पत्राद्वारे दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.