जून्या जलवाहिन्यांवरील झडपा बदलणार
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १.२९ कोटींचा खर्च; १० ठिकाणच्या झडपांचे आधुनिकीकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईतील पाणीपुरवठा व्यवस्थेतील बिघाड रोखण्यासाठी महापालिका शहर विभागातील १० ठिकाणच्या जुन्या झडपा बदलणार आहे. काही झडपा १५ ते ३० वर्षे जुन्या झाल्याने वारंवार नादुरुस्त होत असून, त्यातून पाण्याची गळती आणि वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या झडपा बदलण्यासाठी १ कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
शहरातील जलवाहिन्यांवर बसवलेल्या झडपांच्या सहाय्याने पाणीपुरवठ्याचे नियंत्रण केले जाते, मात्र जुन्या झडपांच्या सांगाड्यांची आणि ॲडॅप्टरची झीज झाल्याने त्या उघडताना किंवा बंद करताना बिघाड होतो. विशेषतः एफ/उत्तर विभागातील रावळी जलाशयाचे आऊटलेट आणि खालसा महाविद्यालय परिसरातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या झडपांमध्ये वारंवार समस्या निर्माण होत आहेत. या झडपांचे गिअर बॉक्सही निकामी होत असल्याच्या तक्रारी आहेत.
झडपांमधून पाणी गळत राहिल्यास संबंधित जलवाहिन्यांमधील प्रवाह नियंत्रित करणे कठीण होते. परिणामी जलाशयातील पाण्याच्या पातळीवर आणि इतर विभागांच्या वितरण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टप्प्यातील भागांत पुरेशा दाबाने पाणी पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या झडपांच्या जागी आधुनिक बटरफ्लाय झडपा बसविण्यात येणार आहेत.
या कामात रावळी जलाशयासह तानसा पूर्व आणि पश्चिम जलवाहिन्यांवरील झडपा, मंत्रालय परिसरातील झडप तसेच शहरातील विविध मुख्य जलवाहिन्यांवरील ६०० आणि ७५० मिलिमीटर व्यासाच्या जुन्या झडपांचा समावेश आहे. देखभाल-दुरुस्तीच्या वेळी जलवाहिन्यांतील पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी या झडपा महत्त्वाच्या ठरतात.
महापालिकेने मागविलेल्या निविदांमध्ये निशीथ ट्रेडर्स यांचा ९९.५६ लाख रुपयांचा देकार सर्वांत कमी ठरला. हा दर कार्यालयीन अंदाजापेक्षा ३.०१ टक्के कमी आहे. वस्तू व सेवा करासह कंत्राटाची किंमत १.१७ कोटी रुपये असून, पर्यवेक्षण शुल्कासह एकूण अंदाजित खर्च १.२९ कोटी रुपये आहे. कंत्राटाचा कालावधी पावसाळा वगळून १२ महिने असून, झडपांना ३६ महिन्यांची हमी असेल. या कामाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.