एसटी भरतीत फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई
खासगी संस्थांच्या कारभाराची चौकशी करण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : ‘एसटी महामंडळात लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत नोकरीचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या खासगी संस्था आणि संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी,’ असे निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (ता. १३) दिले आहेत.
एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था बेरोजगार तरुणांना नोकरीचे प्रलोभन दाखवत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. नोकरीच्या अपेक्षेने पैसे देणाऱ्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असून, त्यामुळे महामंडळाच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागामार्फत अशा बेकायदा प्रकारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले आहेत. उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या संस्था आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी भरती प्रक्रिया बाह्य संस्थेमार्फत राबविण्यात येणार असली, तरी उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांनुसारच होणे आवश्यक आहे. संबंधित खासगी संस्था आणि एसटी प्रशासनाने याबाबत दक्षता घ्यावी, भरती प्रक्रियेत कोणत्याही उमेदवाराची फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची नसेल, असेही सरनाईक यांनी बजावले. भरतीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उमेदवारांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.