कूपरचे डॉक्टर उभारणार भीक मांगो आंदोलन!
दरमहा १० ते १५ तारखेदरम्यान विद्यावेतन जमा होत असल्याने नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना दरमहा विद्यावेतन मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही विद्यावेतन वेळेवर जमा होत नसल्याने आता डॉक्टरांनी थेट ‘भीक मांगो आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. रुग्णालयातील सुमारे २२५ निवासी डॉक्टरांना दरमहा ९० हजार रुपयांहून अधिक विद्यावेतन मिळते, मात्र हे विद्यावेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळण्याऐवजी साधारणपणे १० ते १५ तारखेदरम्यान जमा होत असल्याची तक्रार डॉक्टरांनी केली आहे.
महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) कूपर शाखेचे अध्यक्ष डॉ. मयूर चौधरी यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. निवासी डॉक्टरांच्या सेवांवर संपूर्ण रुग्णालयाची रुग्णसेवा अवलंबून असताना त्यांचेच विद्यावेतन वेळेवर का मिळत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यावेतन उशिरा मिळाल्याने घरखर्च, कर्जाचे मासिक हप्ते (ईएमआय) आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लिपिक वर्गाला विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) कामासाठी वळवण्यात आल्याने विद्यावेतन वितरणास विलंब होत असल्याचे कारण डॉक्टरांना सांगण्यात आल्याची माहिती आहे, मात्र अन्य अधिकारी आणि प्राध्यापकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच जमा होत असल्याने केवळ निवासी डॉक्टरांनाच विलंब का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रश्नावर पालिका अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने दिवाळीनंतर पालिका आयुक्तांकडे हा मुद्दा मांडण्याची तयारी मार्डने केली आहे. विद्यावेतन नियमितपणे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.