लिफ्ट दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून निविदा जारी
केईएममध्ये रुग्णांची ओढाताण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : परळ येथील केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः हात-पायांचे फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत असून, लिफ्टअभावी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या दुखापतीनुसार वेगवेगळ्या इमारतींमध्ये उपचाराची व्यवस्था करावी लागत आहे. रुग्णांना आवश्यक सुविधा देण्याऐवजी त्यांची वेगवेगळ्या इमारतींमध्ये विभागणी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध नसल्याने हाताचे फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांवर त्याच इमारतीत उपचार केले जात आहेत, तर पायाचे फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांना नव्या इमारतीतील ऑर्थोपेडिक बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) पाठविले जात आहे. नव्या इमारतीमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध असल्याने ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
रुग्णालयातील लिफ्टची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने अखेर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. लिफ्टच्या दुरुस्तीसाठी ई-निविदा जारी करण्यात आली असून, त्यामध्ये लिफ्टची सुरक्षा आणि स्थिरता सुधारण्यासाठी आवश्यक कामांचा समावेश करण्यात आला आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लिफ्टची दुरुस्ती पूर्ण होऊन रुग्णांना दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चालणे अशक्य असलेल्या रुग्णांची विशेष गैरसोय
फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांसाठी लिफ्टची सुविधा अत्यंत महत्त्वाची असते. विशेषतः पायाला फ्रॅक्चर झालेले, प्लास्टर घातलेले किंवा शस्त्रक्रियेनंतर चालणे-फिरणे शक्य नसलेल्या रुग्णांना जिने चढणे-उतरणे कठीण होते. अशा परिस्थितीत लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी अशा रुग्णांना नव्या इमारतीतील ऑर्थोपेडिक ओपीडीत पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
आरोग्य समिती अध्यक्षांकडून पाहणी
आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी शुक्रवारी केईएम रुग्णालयाची पाहणी करून लिफ्टच्या समस्येचा आढावा घेतला. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने ऑर्थोपेडिक रुग्णांसाठी ही पर्यायी व्यवस्था केली आहे. तसेच बंद पडलेली लिफ्ट लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.