व्हीलचेअरवरून स्वावलंबनाचा प्रवास!
अपघातात पायांची हालचाल थांबली; डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत कुटुंबाला दिला आर्थिक आधार
नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : एका अपघाताने योगेश दांडगे यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. चालणारे पाय थांबले, सहा महिने अंथरुणात राहावे लागले. परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी परिस्थितीशी लढण्याचा निर्णय घेतला. झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले. इतकेच नव्हे तर त्यांच्या उपचारासाठी झालेल्या कर्जाचे १० लाख फेडण्यासाठी घरच्यांना मदत केली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर योगेश एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. महिन्याला २५ हजार रुपये पगार मिळत असल्याने कुटुंबाला आर्थिक आधार मिळत होता, मात्र ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीरामपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाताना टाकळी भान परिसरात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. चुकीच्या बाजूने आलेल्या वाहनामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते पुलाखाली पडले. या अपघातात पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.
४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कमरेखालच्या शरीराची ताकद गेल्याने पायांची हालचाल आणि संवेदनाही बंद झाली. सहा महिने अंथरुणावर राहिल्यानंतर त्यांनी फिजिओथेरपी सुरू केली. हळूहळू व्हीलचेअरवर बसण्यास सुरुवात केली, मात्र उपचारांसाठी कुटुंबाची बचत आणि मालमत्ता खर्च झाली. आई-वडिलांवर नऊ ते दहा लाखांचे कर्ज झाले.
आई-वडिलांचे कष्ट पाहून योगेश यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. घरून नोकरी मिळवण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर मुंबईत दिव्यांग व्यक्तींनाही झोमॅटोमध्ये कामाची संधी मिळत असल्याचे त्यांना समजले. व्हीलचेअर मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रियंका लबडे यांच्या मदतीने व्हीलचेअर मिळाल्यानंतर त्यांनी डिलिव्हरीचे काम सुरू केले.
सुरुवातीला कामाचे प्रशिक्षण नसतानाही यूट्युब व्हिडिओ आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी काम शिकून घेतले. काही ग्राहकांनी सहकार्य केले नाही, तर काहींनी काम सोडण्याचा सल्ला दिला, मात्र उन्हात-पावसात व्हीलचेअरवरून पाच-सहा किलोमीटर प्रवास करत त्यांनी ऑर्डर पोहोचवणे सुरूच ठेवले. या काळात व्हीलचेअरवर असताना पायाला फ्रॅक्चर झाले, तसेच राहत्या घराला आग लागून नुकसानही झाले. तरीही त्यांनी संघर्ष सुरू ठेवला. मेहनतीच्या जोरावर आई-वडिलांचे कर्ज फेडण्यास मदत केल्याचे समाधान त्यांना आहे.
एक लाख फॉलोअर्स
लोकांपर्यंत ऑर्डर पोहोचवताना योगेश दांडगे यांनी स्वतःचा संघर्ष, दैनंदिन आयुष्य, सकारात्मक विचार आणि प्रेरणादायी प्रवास हा सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. सुरुवातीला कदाचित फार कमी लोकांनी त्यांना पाहिलं असेल, पण त्यांच्या प्रामाणिकपणाने, मेहनतीने आणि जिद्दीने हजारो लोकांची मनं जिंकली. आज सोशल मीडियावर जवळपास एक लाख फॉलोअर्स असलेले योगेश अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
‘दिव्यांग व्यक्तींनी स्वतःला स्वीकारून घराबाहेर पडावे. प्रयत्न केल्याशिवाय बदल घडत नाही. समाजानेही दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करून त्यांच्या भावनांचा आदर करावा.
- योगेश दांडगे, डिलिव्हरी बॉय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.