पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाने बागायतदार चिंतेत
नारळ-सुपारीच्या उत्पादनात घट; शासनाकडून अनुदानाची मागणी
मुरूड, ता. ७ (बातमीदार) ः निसर्गसान्निध्य लाभलेल्या कोकणात नारळ व सुपारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, मात्र यंदा पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाने सुपारीसह नारळाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे. चक्रीवादळामुळे आधीच मुरूड, दिवेआगर व श्रीवर्धन येथील सुपारी व नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अस्मानी संकटातून शेतकरी सावरला असताना, आता पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाने लागवड क्षेत्र कमालीचे घटले आहे. स्थानिक बागायतदार आर्थिकदृष्ट्या चिंतेत असून, पुनर्लागवड क्षेत्र वाढीस लागण्यासाठी प्रोत्साहन म्हणून भरीव शासन अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहे.
मुरूड तालुक्यातील एकूण बागायत क्षेत्रांपैकी ४३५ हेक्टर क्षेत्रावर नारळ-सुपारी पिकांची लागवड करण्यात येते. त्यापैकी ४१६ हेक्टरवर नारळ-सुपारीची लागवड करण्यात आली असून, श्रीवर्धन रोठा ब्रँडच्या सुपारीला मोठी मागणी असते. या सुपारीचा दर्जा उत्तम असल्याने देश-विदेशात त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मुरूड तालुक्यासह नांदगाव, मजगाव, आगरदांडा, मांडला, भोईघर, सर्वे-चिकणी, काशिद, बोर्ली, दांडा व अन्य अनेक गावांमधून नारळाचे उत्पादन घेतले जाते, मात्र २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील ७७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे फळे देणारी कित्येक माडाची झाडे अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बागायतमधील विहिरींमध्ये पाणी मुबलक असले तरी क्षाराच्या वाढलेल्या प्रमाणामुळे फळांना गळती सुरू झाली आहे, याशिवाय नारळाच्या झाडांना विविध रोगांनी ग्रासले आहे. यात उभ्या झाडाचा कोवळा कोंब कुजून त्यात अळ्या पडणे, झाडांच्या पानांवर करपा रोग पडून झाप करपणे, झापावर मर रोग पडणे, गेंड्या भुंग्याने झाडचा गर शोषून घेणे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने झाडांच्या पानांवर पांढरी बुरशी दिसून येणे, आदी रोगांमुळे झाडांचे अन्नरस तयार होण्याचे प्रमाण कमी होते. चक्राकार पांढरी माशी सतत रस शोषून घेते, तसेच तिच्या शरीरातून चिकट द्रव बाहेर पडत असल्याने काळी बुरशी वाढते. परिणामी अन्न प्रकियेत अडथळा निर्माण होतो व माडाची वाढ व उत्पन्न कमी होते. त्यामुळे यंदा पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाने अनेक नारळावर डाग पडणे, तसेच खोडावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव खोडावर होत आहे. वेळीच उपाययोजना केली नाही, तर झाडे मरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कृषी विभागाने सर्वेक्षण करून यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
.....................
औषध फवारणी तांत्रिकदृष्ट्या अवघड :
औषध फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या टू स्ट्रोक पॉवर स्प्रेची किंमत बाजारात ५० हजारांहून अधिक असल्याने गरीब बागायतदारांना पंप खरेदी करणे आवाक्याच्या बाहेरचे आहे, शिवाय अशा पंपाने फवारणी २५ ते ३० फुटांपर्यंतच शक्य होते. येथील माडाची झाडे जुन्या वाणांची असल्याने ती उंच वाढणारी असून, ती ८० ते ९० फुटांपर्यंत आहे. त्यामुळे फवारणी करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. माडांच्या झाडांवर चढून नारळ पाडणाऱ्या पाडेकऱ्यांचीच येथे वानवा असल्याने औषध फवारणी करणे मुश्कील झाले आहे. अशा विविध समस्यांनी येथील शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे.
...............
माड पाडेकऱ्यांच्या वानवा
२०२० पूर्वी मुरूड तालुक्यातून दर आठवड्याला सुमारे सात ते आठ ट्रक शहाळी मुंबई, वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीला जात असत. ते प्रमाण आता चार ते पाच ट्रकऐवजी टेम्पोवर आले आहे. माड पाडेकऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. युवा पिढी यात काम करण्याच इच्छुक नाही. त्यामुळे उपलब्ध पाडेकऱ्यांच्या मिन्नतवाऱ्या करून नारळ पाडावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. पाडेकऱ्यांना विमा संरक्षण नाही. त्यामुळे उंचच उंच ६०-७० फुटांवर चढायला युवापिढी तयार होत नाही. त्यामुळे फळ काढणी मोठी समस्या होऊ पहात आहे. काही बागातदार माड माडीसाठी वार्षिक लिलाव बोलीने देणे पसंत करतात. सरासरी १५०० ते २००० रुपये एका माडासाठी वार्षिक उत्पन्न मिळू शकते, मात्र माडीला माड दिले की, माड लवकर मरतात अशी भीती बुर्जुग मंडळी घालतात.
......................
प्रतिक्रिया
पांढरी माशी वा अन्य किटाणू नियंत्रण करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड १७. ८ एस. एल ०. ००५ टक्के तीन मिली प्रति १० लिटर पाण्यातून किंवा ०.५ टक्के निमतेल वापरून फवारणी करावी.
-जीवन आरेकर, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद, रोहा
.......................
प्रतिक्रिया
नारळ व सुपारी लागवडीसाठी मॅन्ग्रोरोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेमधून अनुदान उपलब्ध आहे. सुपारी लागवडीसाठी हेक्टरी २, ७२, ४१० रुपये व नारळ लागवडीसाठी हेक्टरी १,६९,५०१ रुपये अनुदान दिले जाते. औषधे व खते पुरवठा मात्र केला जात नाही.
-मनीषा भुजबळ, कृषी अधिकारी, मुरूड तालुका
..................
निसर्ग चक्रीवादळात संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील नारळ सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. शासनाने पंचनामे तत्परतेने केले, परंतु नुकसानभरपाई अतिशय तुटपुंजी दिली. ५० ते ६० वर्षांपूर्वीची चांगली फळे देणाऱ्या बागा उद्ध्वस्त झाल्या. बाधित क्षेत्रात पुनर्लागवडीचे प्रमाण वाढण्यासाठी भरीव शासन अनुदान मिळावे, अशी अपेक्षा आहे.
सुरेश वर्तक, शेतकरी, मुरूड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.