लक्ष्मीखारमध्ये नागरिकांच्या घरात शिरले पाणी
२४ तासांत ३७१ मिमी विक्रमी पाऊस; नागरिक धास्तावले
मुरूड, ता. २६ (बातमीदार) ः मुसळधार पावसामुळे दत्तमंदिरजवळील डोंगराला भगदाड पडून काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे, तर एसटी डेपो व परिसरात गटारे दुथडी भरून वाहू लागल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली.
रविवार (ता. २५)पासून संततधार पाऊस कोसळत असून, २४ तासांत ३७१ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. मे महिन्यातच विहिरी, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर मुरूड शहरातील गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. समुद्राला भरती आल्याने मुरूडसह मंडळातील लक्ष्मीखार, उंडरगाव, शिघ्रे येथील घरांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मौजे तेलवडे येथे मातीचे धस कोसळून एका घराचे नुकसान झाले, तर उंडरगाव येथे चार ते पाच घरांमध्ये पाणी घुसले आहे. आगरदांडा येथील बौद्ध स्मशानभूमीची भिंत कोसळल्याची घटना घडली, तर मिठागर येथे डोंगराची माती खचल्याने चंद्रकांत ठाकूर यांच्या पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामस्थांना पूर्वमॉन्सूनचा तडाखा
लक्ष्मीखार ग्रामस्थांना दरवर्षीप्रमाणे यंदाही पूर्वमॉन्सूनचा तडाखा बसला. सकाळच्या सुमारास अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची दैना उडाली. डोंगरातून वाहत असलेली सती नदीच्या प्रवाहाचा मार्ग गाळ काढून मोकळा केल्यास कायमचे संकट मिटेल, असे मत आगरी समाज अध्यक्ष प्रवीण बैकर यांनी व्यक्त केले. या कामी नगर परिषदेकडून आठ कोटींचा निधीही मंजूर झाल्याची त्यांनी माहिती दिली. लक्ष्मीखार येथील नागरिकांची ही दरवर्षी होणारी त्रेधातिरपीट थांबली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
शिघ्रे गावात बांधकाम खात्यातर्फे मोरीचे काम सुरू असल्याने गटाराचे पाणी अडले जात आहे. यामुळे अंदाजे ५५ ते ६० घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याची माहिती मुरूड मंडळ अधिकारी कचरे यांनी दिली. सुवर्णा शिपिंग कंपनी व दिघी जलवाहतूक कंपनीची आगरदांडा जंगल जेट्टी सेवा बंद असल्यामुळे श्रीवर्धन व म्हसळा जाणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची गैरसोय झाली.
मुरूड शहरातील विहिरी मे महिन्यात भरण्याची घटना ६० वर्षांत प्रथमच अनुभवल्याचे गणेश पाखाडीतील ज्येष्ठ नागरिक सुरेश वर्तक यांनी सांगितले.
मुरूड प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पाऊस थांबल्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र नुकसानग्रस्तांना योग्य पद्धतीने पंचनामे करून शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोबत - फोटो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.