माथेरान, ता. १८ (बातमीदार) ः माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवारी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून, स्थानिकांसह अनेक संस्थानी पाठिंबा दर्शवला. शहरात पहिल्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्स, लॉजिंग, ई-रिक्षा बंदमध्ये सामील झाले होते. अश्वचालक वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. याप्रकरणी प्रशासनाने त्वरित घेणे अपेक्षित असताना बुधवारी बैठक बोलावण्यात आल्याने दिवसभर बंद पाळण्यात आला.
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची दिशाभूल, फसवणूक केली जाते. यामुळे माथेरानमधील व्यवसायात मंदी आली आहे. दरम्यान, अश्वचालकांकडून दस्तुरी येथे भरमसाट दर, तर शहरात कमी दर, असा अनुभव आलेल्या पर्यटकांनी समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्यावर अनेकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. या प्रकारामुळे माथेरानची बदनामी होत असल्याने पर्यटनांचा ओघ कमी होऊ शकतो, यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने बंदची हाक दिली आहे.
समितीमध्ये सर्व पक्षाच्या नेतेमंडळींचा समावेश असून, स्थानिकांसह लॉजिंग संघटना, श्रमिक हातरिक्षा चालक-मालक संघटना, ई-रिक्षाचालकांनी बंदला पाठिंबा दर्शविला. मिनी ट्रेन आणि घोडे वगळता मंगळवारी सकाळपासून सर्व दुकाने बंद होती. ज्या हॉटेलवाल्यांनी आधीच बुकिंग घेतली होती, त्याच पर्यटकांना हॉटेलमध्ये घेण्यात आली. दरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील श्रीराम चौक येथे सर्व नेते आणि नागरिकांमध्ये चर्चा सुरू असताना, बुधवारी १९ सकाळी ११ वाजता बाळासाहेब ठाकरे सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आल्याचे पत्र प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे दिवसभर बंद पाळून बुधवारी सभेनंतर पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र येऊन लढा देत आहेत. १९ तारखेला नगरपालिका सभागृहात बैठक आयोजित केली आहे. त्या वेळी एकजूट दिसली पाहिजे. आपली लढाई पर्यटकांची दिशाभूल, त्यांची फसवणूक रोखण्यासाठी आहे. या बंदमध्ये पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
- अजय सावंत, संयोजक, माथेरान पर्यटन बचाव समिती
माथेरान बंदच्या अनुषंगाने बुधवारी बाळासाहेब ठाकरे सभागृहात सभेचे आयोजन केले आहे. कर्जत तालुक्याचे आमदार आणि प्रांताधिकारी सभेला उपस्थित राहणार आहेत. या वेळी सकारात्मक निर्णय होण्याची आशा आहे. त्यामुळे पुन्हा माथेरानचे पर्यटन बहरून येईल. आता पर्यटनावर जो परिणाम झाला आहे, ते पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेऊ.
- सुरेंद्र ठाकूर, अधीक्षक, महसूल विभाग माथेरान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.