मुंबई

रिक्षा चालकांच्या मुजोरीला लागणार ब्रेक

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्‍या प्रवाशांना हाताला धरून रिक्षामध्ये ओढत नेणे, अपेक्षित भाडे मिळेपर्यंत आडमुठी भूमिका घेत रिक्षा रस्त्यात लावून ठेवणे, भाडे नाकारणे, बेशिस्तपणे रिक्षा पार्किंग करणे, महिला प्रवाशांना त्रास देणे, रेल्वेच्या हद्दीत उभे राहून प्रवाशांचा भाड्यासाठी पाठलाग करणे, अशा प्रकाराने सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांची ठाणे स्थानक परिसरात सुरू असलेल्या या मुजोरीला अखेर ब्रेक लावण्यात येणार आहे. यासाठी बेशिस्त रिक्षाचालकांवर यापुढे ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिस संयुक्त कारवाई करणार असून त्यासाठी सीसी टीव्ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ठाणे रेल्वेस्थानकात सॅटीसची उभारणी केल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी स्वतंत्र रिक्षा थांबा देण्यात आला आहे. मात्र गर्दीच्या वेळी एकीकडे प्रवासी रिक्षासाठी रांगा लावत असताना या स्टँडकडे न वळता काही मुजोर रिक्षाचालक स्थानक परिसराला गराडा घालतात. काही रिक्षाचालक तर थेट फलाटावर जात असून प्रवाशांचे हात व सामान खेचून रिक्षात बसण्यासाठी जबरदस्ती करतात. इतकेच नव्हेतर जवळचे भाडे नाकारून आणि मीटरप्रमाणे भाडे न घेता मन मानेल त्या पद्धतीने वागत असल्याचेही निदर्शनास येत आहे. वर्षानुवर्षे ठाणे स्थानकाबाहेर काही रिक्षाचालकांचा हा गोरखधंदा सुरू असून त्याचा त्रास नाहक प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून तक्रारी वाढल्याने त्याची दखल ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतली आहे.
प्रवाशांच्या तक्रारींची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी तातडीने स्टेशन परिसरात दौरा केला. यावेळी ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा त्यांनी पाहिला. रिक्षांमुळे होणारी वाहतूक कोंडी, कर्णकर्कश्य हॉर्नचे आवाज ही परिस्थिती पाहिल्यामुळे त्यांनी तत्काळ वाहतूक पोलिसांसोबत बैठक घेतली. या बैठकीला वाहतूक पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड, परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त गणेश गावडे, महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. यावेळी रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासोबतच खासगी वाहनांची कोंडी टाळण्यासाठी वातानुकूलित टँक्सी स्टँड दुसऱ्‍या लेनमध्ये सुरू करण्यावरही चर्चा झाली. याशिवाय पोलिसांच्या सुचनेनुसार सॅटिस पुलाखालील परिसरात भरपूर प्रकाश राहील अशा पद्धतीने विद्युत दिवे लावण्याचे निर्देश बांगर यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाला दिले.
...
कारवाईनंतरही बेशिस्तपणा कायम
गेल्या वर्षभरात ५०० हून अधिक बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर ही परिस्थिती बदललेली नसल्याचे पोलिसांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे यापुढे ठाणे रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांची नियुक्ती विशेष स्वरूपात करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यातून भाडे नाकारणे, बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या रिक्षाचालकांसह अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या, ज्या रिक्षा विनापरवाना चालवल्या जात आहेत त्या जप्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या कामात ठाणे महापालिकाही पोलिसांना सहकार्य करेल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
...
रिक्षा संघटनांशी चर्चा करणार
रिक्षावाल्यांच्या काही जुन्या संघटना असून त्या नियमानुसार व्यवसाय करतात, अशा संघटनांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण होईल. त्यांना व्यवसाय करण्यासाठी निर्धोक वातावरण निर्माण होईल याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
.
सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणार
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात यापुढे वाहतूक कोंडीवर नियंत्रण, तसेच रिक्षावाल्यांच्या मुजोरीला चाप बसविण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. या ठिकाणी सीसी टीव्ही यंत्रणा उपलब्ध करून देऊन त्याचे नियंत्रण हे नौपाडा पोलिस ठाण्यात असेल. या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच ठाणे स्थानक परिसरात पोलिस कर्मचारी ड्युटीवर आहेत की नाही याची देखील माहिती पोलिस विभागाला मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT