जावईबापूंच्या पाहुणचाराचे बेत
अधिक महिन्यातील धोंड्याची परंपरा आजही कायम
वसंत जाधव ः नवीन पनवेल
हिंदू धर्मानुसार, विवाह प्रथेत जावयाला नारायणाचे रूप मानले जाते. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचे रूप मानले जाते. तीन वर्षांनंतर एकदा येणारा अधिक मास हा जावई मंडळींसाठी पर्वणीच असतो. महाराष्ट्रात अधिक मासाला ‘धोंड्याचा महिना’ असेही संबोधले जाते. यंदा १८ जुलैपासून अधिक महिना सुरू होत असून १६ ऑगस्टला समाप्त होणार आहे. त्यामुळे जावयाच्या पाहुणचाराचे बेत आखले जात आहेत. तुपातील ३३ अनारशांचे वाण चांदी किंवा तांब्याच्या ताटात सजवून त्यात तुपाचा दिवा लावून जावयाला देण्याची परपंरा आजही अनेक ठिकाणी कायम आहे.
मुलींच्या आई-वडिलांना जावईबापूंच्या मानसन्मानासाठी खास आमंत्रण द्यावे लागते. गोडधोड जेवणासह सोन्या-चांदीची भेटवस्तू द्यावी लागते. अधिक महिन्यात संक्रांत नसल्यामुळे चंद्रसूर्यांच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये, म्हणून काही नियम व व्रते आजही पाळली जातात. यामुळे आयुष्यात सुख, शांती, समाधान मिळते, मनोकामना पूर्ण होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या महिन्यात धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाते. मंदिरात पोथी, पुराण, भजन, कीर्तन, पारायणाचे नियोजन केले जाते.
अधिक मास अर्थात ग्रामीण भागासह शहरी भागातही परंपरेनुसार मानला जातो. या महिन्यात गोडधोड खाण्यासाठी लेकीसह जावईबापूंना मानाचे आमंत्रण देऊन बोलावले जाते. पुरणपोळीसह अन्य पक्वान्नांचे जेवण बनवले जाते. लेक-जावयास नवीन कपडे, संसारोपयोगी वस्तू, स्टील, चांदीच्या भांड्यात धोंडे घालून देण्याचीही प्रथा आहे. नवीन लग्न झालेले असल्यास सोन्या-चांदीचे धोंडे देण्याचीही काही भागात प्रथा आहे. त्याचबरोबर हौशी मंडळींकडून जावयास सोन्याची अंगठी, ब्रेसलेट असे दागिनेही दिले जातात. या महिन्यात विवाह समारंभ होत नाहीत, मात्र मानपानाचा महिना असल्याने मित्र-आप्तेष्टांकडे मानपान व जेवणावळी झडत असतात.
सहा वर्षांनी पाहुणचार
मागील अधिक महिना हा कोरोनामध्ये आला होता. यादरम्यान सण-समारंभावरील निर्बंध व साथीच्या रोगाच्या भीतीने मागील अधिक महिना कुणालाही साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदाचा धोंडफळ हा सहा वर्षांतून आल्याने मानपानापासून वंचित राहिलेल्या जावयांचा यथेच्छ पाहुणचार करण्याचे नियोजन केले जात आहे.
दुष्काळातील तेरावा महिना हाच
दुष्काळात तेरावा महिना ही म्हण मराठीत प्रचलित आहे. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडत असे. त्यात चुकून अधिक महिना आला तर दुष्काळाचे दिवस वाढत असल्याने ही म्हण प्रचलित झाली. याचे दुसरे कारण या महिन्यात जावयाचा पाहुणचार करताना मुलीच्या आई-वडिलांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. लाडक्या लेकीला सासरी सुखात ठेवावे, या अपेक्षेने जावयाचे लाड पुरवले जात असल्याचेही गमतीने बोलले जाते.
असे होते जावयाचे आदरातिथ्य
अधिक महिन्यात जावयाला वाण दिले जाते. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला दिला जातो. अनारशांऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, जाळीदार पदार्थही दिले जातात. त्यांनी संख्या ३३ असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यांसारख्या वस्तू ३३ पटीत दानही केल्या जातात.
३३ संख्येला विशेष महत्त्व
वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे, अधिक महिना हा ३२ महिने १६ दिवस आणि ८ तासांच्या नंतर म्हणजे सुमारे ३३ महिन्यांच्या नंतर येतो. या ३३ महिन्यांसाठी म्हणून ३३ वस्तूंचे दान केले जाते. याचा उल्लेख अनेकदा तीस-तीन असा केला जातो. पूर्ण महिना हा ३० दिवसांचा असतो. त्यामुळे एखादे व्रत दिवसातून एकदाच करायचे असले तर शेवटचे ३ दिवस ते दिवसातून दोन वेळा करून ३३ ही संख्या पूर्ण केली जाते.
चांदीच्या भेटवस्तूला महत्त्व
लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्याच भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्त्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांतून झाल्याची मान्यता आहे. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. मुलीचे आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरंजन भेटवस्तू म्हणून दिले जाते.
यंदा अधिक श्रावण
दर तेहेतीस महिन्यांनी अधिक मास येतो. सूर्य वर्षातील १२ राशीपैकी प्रत्येक महिन्यात एकेक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत म्हणतात. चैत्र महिन्यापासून फाल्गून महिन्यापर्यंत बारा महिन्यांत प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते. यात बदल होत होत ३३ महिन्यांनी असा महिना येतो, की यात संक्रांत नसते. या त्या बिनसंक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात. त्यामुळे यंदाचा मास हा अधिक श्रावण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.