उरण, ता. १७ (बातमीदार)ः उरण तालुक्यात विविध राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात जल, तसेच वायुप्रदूषण होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर वेळीच कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे, नाहीतर भोपाळ येथील गॅस गळतीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती उरणमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही.
उरण तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून कार्यरत असलेल्या ओएनजीसी प्रकल्पाने कंपनीमधून मोठ्या प्रमाणात हवेचे तसेच जल प्रदूषण होत आहे. या कंपनीमुळे नागाव तसेच म्हातवली या दोन ग्रामपंचायत हद्दीत प्रदूषणाने कहर केला आहे. कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या सल्फरयुक्त एसओटू व एचटूएस रसायने, तसेच नाफ्ता नाल्यावाटे समुद्रात सोडला जात आहे. अनेकदा रसायन युक्त पाणी गावात पसरत असल्याने गावातील नागरिक, तसेच पशुधनासाठी हा प्रकार जीवघेणा आहे. तसेच वारंवार सोडलेल्या रसायनांमुळे अनेक वेळा समुद्रातील मासे मृत पावलेले आहेत. तसेच या प्रकल्पामधून हायड्रोजन सल्फाईड वायू नेहमी हवेत सोडला जातो. त्यामुळे नागाव, म्हातवली, काठेआळी, अंबिकावाडी, चारफाटा, ओएनजीसी रोड परिसर, उरण शहर परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. यासंदर्भात ओएनजीसी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.
-----------------------------------------
प्रदूषणामुळे झालेले दुष्परिणाम
- या परिसरातील विहिरी, कूपनलिकेच्या पाण्याला गॅसचा विशिष्ट वास येत आहे. तेच पाणी नागरिक पितात. त्यामुळे अनेकांना श्वसनाचे अनेक गंभीर रोग होत आहेत. तसेच नाल्यातून सोडल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त पाण्याला आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते.
- ओएनजीसी प्रकल्पाने विनापरवानगी हजारो झाडांची कत्तल केली आहे. मात्र, निसर्ग समृद्ध करण्यासाठी कुठेही कंपनी प्रशासनाने वृक्षारोपण केलेले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रकल्पाचे काम सुरू आहे.
- ३ सप्टेंबर २०१९ मध्ये ओएनजीसी कंपनीने मोठ्या प्रमाणावर नाफ्ता तेल (रसायन) नाल्यात सोडले होते. ते पाणी नागाव गावात आले होते. या घटनेत जीवितहानी झाली होती.
-----------------------------------------------
श्वसनाचे आजार बळावले
गेल्या काही दिवसांपासून नागाव परिसरात दिवस-रात्र सल्फरसदृश रबर जाळल्याचा वास नागरिकांना मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे नागरिक घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करून घरातच राहत आहेत. अनेकांना घरात राहणेही अवघड झाले आहे. कंपनीच्या प्रदूषणामुळे श्वास जड होणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, हृदय तसेच श्वसनाचे रोग यांसारख्या आजारांत वाढ झाली आहे.
---------------------------------
ओएनजीसीच्या माध्यमातून सोडल्या जाणाऱ्या रसायनांमुळे मोठ्या प्रमाणात जल, तसेच वायुप्रदूषण होत आहे. त्यामुळे डोळे चुरचुरणे, श्वास दुर्गंधी येणे असे प्रकार घडत असल्याने दारे-खिडक्या बंद करून राहण्याची वेळ आली आहे.
- मीनाक्षी पाटील, ग्रामस्थ
-------------------------------------
नागाव परिसरात संध्याकाळी उग्र वास पसरतो. या संदर्भात तहसीलदारांना पत्र दिले आहे. तसेच ओएनजीसीच्या प्लांट मॅनेजरसोबत बैठक घेण्यात आली आहे. त्यांनी लवकरच समस्यांचे निराकरण करू, असे सांगितले आहे.
- चेतन गायकवाड, सरपंच, नागाव
----------------------------------------
उरण परिसरात ओएनजीसीमार्फत होणारे जल, वायुप्रदूषणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच लवकरच ओएनजीसी कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
- वैभव कडू, सामाजिक कार्यकर्ते
----------------------------------------
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून ओएनजीसी प्रशासनाविरोधात प्राप्त तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली आहे.
- विक्रांत भालेराव, उप-प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.