वसई, ता. २८ (बातमीदार) : वसई-विरार शहरातील लोकसंख्या व नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणात स्वच्छतेसाठीदेखील प्रयत्न केले जात आहेत. यात सफाई कामगाराचा मोलाचा वाटा असतो. मलनिःसारण टाक्यांची स्वच्छता व नालेसफाई कर्मचारी जीव धोक्यात घालून करतात. याच कामगारांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नमस्ते योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिका प्रशासन सर्वेक्षणासाठी पाऊल उचलणार असून नऊ केंद्र उभारणार आहे.
वसई-विरार शहरात लोकवस्ती पंचवीस लाखांच्या घरात गेली आहे. मलनिःसारण ही गंभीर समस्या आहे; मात्र सफाई कर्मचारी शहर स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी काम करतात. टाक्यांची स्वच्छता, सांडपाणी स्वच्छता करतात, परंतु त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. अनेकदा त्वचा विकार, श्वसन विकाराला सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीदेखील हलाखीची असते. अशा कर्मचाऱ्यांना नमस्ते योजनेतून फायदा मिळावा यासाठी वसई-विरार महापालिका नऊ प्रभागांत नऊ केंद्रे उभारणार आहे. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांकडून केंद्राने मागवलेल्या माहितीनुसार अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठी संगणक, इंटरनेट व्यवस्था केली जाणार आहे. या योजनेमुळे भविष्यात कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण, कौटुंबिक आरोग्य विमा यासह अन्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
खासगी आणि प्रशासकीय सफाई कर्मचाऱ्यांपैकी केवळ मलनिःसारण टाक्यांची स्वच्छता, सक्शनद्वारे सफाई व नालेसफाई करणाऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
वसई-विरार महापालिका व खासगी कर्मचाऱ्यांना नमस्ते योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन लवकरच अशा कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र उभारले जाईल व सविस्तर माहिती घेण्यात येईल.
- डॉ. चारुशीला पंडित, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.