भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : मुंबई-वडोदरा या ड्रीम प्रोजेक्टमध्ये भिवंडी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या जमीनमालकांना शेतजमिनीचा बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा मोबदला मिळत असताना अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत. सुरुवातीला बनावट शेतकऱ्यांनी बळकावलेले ११ कोटी व त्यानंतर आदिवासी वृद्ध महिलेची फसवणूक करीत ५७ लाख रुपयांचा मलिदा लाटल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर आता अशाच एका जमीन मोबदलाप्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करीत तब्बल १६ कोटी रुपयांचा मलिदा भूमाफियाने लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई-वडोदरा मार्गामध्ये तालुक्यातील मौजे वडपे येथील मृत द्वारकाबाई काशिनाथ पाटील यांच्या मालकीची विविध सर्व्हे नंबरमधील सुमारे १३ एकरमधील सहा एकर जमीन मुंबई-वडोदरा महामार्गात बाधित झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुले व मुली असे नऊ वारस सातबारा उताऱ्यावर दाखल आहेत. असे असताना हरिभाऊ या वारस मुलाने बहिणी हिराबाई, ताराबाई, रमाबाई, जिजाबाई यांना फसवून त्यांचे हक्कसोड पत्र घेतले. तसेच मयत भाऊ रामदास यांनी आपला मुलगा बाळकृष्ण यांच्या नावे जमिनीचे बक्षिसपत्र केलेले असताना हरिभाऊ याने सर्वांना अंधारात ठेऊन जमिनीची परस्पर विक्री देवराज म्हात्रे यांच्या नावे केली. त्यानंतर देवराज म्हात्रे याने निखिल राधेश्याम अग्रवाल यांच्या नावे काही भाग जमीन विक्रीचे खरेदीखत केले. या जमीन मोबदल्याचे हरिभाऊ पाटील याला पाच कोटी एक लाख ७५ हजार ४७२ रुपये, देवराज म्हात्रेला तीन कोटी ८८ लाख १० हजार ६५१ रुपये, निखिल राध्येशाम अग्रवाल याला सहा कोटी २८ लाख २८ हजार ५०८ रुपये; तर वैशाली लक्ष्मण पाटील हिला ५४ लाख ४० हजार ४६३ रुपये असे एकूण १५ कोटी ७२ लाख ५५ हजार ९४ रुपयांचा जमीन मोबदला उपविभागीय कार्यालयातून मिळवला. त्यानंतर वरील जमिनीचे वारस यांना रक्कम घेण्यासाठी पत्र मिळाल्यावर या शेतकरी कुटुंबीयांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मागील दोन वर्षे सर्व गरीब शेतकरी वारसदार उपविभागीय अधिकारी कार्यालयात हेलपाटे मारून आपल्या हक्काचे पैसे मिळावेत म्हणून विनंती करीत आहेत.
-------------------
जमीन विक्रीचे प्रकरण जुने असून तत्कालीन अधिकारी यांच्या काळातील आहे. यामध्ये नक्की कोणती चूक झालेली आहे, हे सर्व कागदपत्रे तपासून गुन्हे करणाऱ्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
- अमित सानप, उपविभागीय अधिकारी, भिवंडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.