मुंबई, ता. २८ : जागतिक मानांकन संस्था एस अँड पी ने भारताचा जीडीपीबाबतचा अंदाज वाढवल्याने आज (ता. २८) भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी चांगली उसळी घेतली. आज सेन्सेक्स २०४.१६ अंश तर निफ्टी ९५ अंशांनी वाढला. यामुळे आता यापुढेही निर्देशांकांची आगेकूच होईल, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवीत आहेत.
या तेजीमुळे आज सेन्सेक्स पुन्हा ६६ हजारांच्या वर गेला; तर निफ्टीनेदेखील १९,८७५ च्या महत्त्वाचा प्रतिरोध टप्पा ओलांडला आहे. जागतिक शेअर बाजारांमधील संकेत संमिश्र असल्याने आज भारतीय शेअर बाजारांची सुरुवातही संथ होती; मात्र शेवटच्या तास दीड तासांमधील जोरदार खरेदीमुळे निर्देशांक वाढले. दिवसअखेर सेन्सेक्स ६६ हजार १७४.२० अंशांवर; तर निफ्टी १९,८८९.७० अंशांवर स्थिरावला.
आज वाहननिर्मिती कंपन्या, सरकारी बँका, धातूनिर्मिती कंपन्या, ऊर्जा, ऑईल अँड गॅस या क्षेत्राचे निर्देशांक वाढले; तर आरोग्य आणि औषधी निर्मिती कंपन्यांचे शेअर घसरले होते. केंद्र सरकार लवकरच खाणींचा लिलाव सुरू करणार असल्यामुळे त्या क्षेत्रातील शेअर आज चर्चेत होते; तर सणासुदीला मागणी वाढल्यामुळे वाहन निर्मिती क्षेत्राचे शेअरही तेजीत होते. लग्नसराईच्या हंगामात विक्रमी संख्येने विवाह होणार असल्याने सर्वत्र मागणी वाढण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
बीएसईवर टाटा मोटर साडेतीन टक्के वाढला. बजाज फिन्सर्व्ह आणि अल्ट्राटेक सिमेंट दोन टक्के वाढले. बजाज फायनान्स, एअरटेल, टायटन, ॲक्सिस बँक, महिंद्र आणि महिंद्र, स्टेट बँक, टाटा स्टील हे शेअर एक टक्क्यांच्या आसपास वाढले; तर आयटीसी, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक हे शेअर अत्यंत किरकोळ प्रमाणात घसरले.
............
शेअर बाजार निर्देशांक सात दिवस साधारण स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आज त्यांनी ब्रेकआऊट दिला. ही शॉर्ट कव्हरिंग रॅली असली तरीही निफ्टीने १९,८७५ चा मोठा प्रतिरोध ओलांडला आहे. त्यामुळे आता या पातळीवर निफ्टी स्थिरावल्यास तो लवकरच वीस हजारपर्यंत जाणेही शक्य आहे.
- श्रीश्याम गुप्ता, संचालक, रुपीझी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.