ऑपरेशन महाराष्ट्र :
राहुल गांधींनी मान्यता दिल्यास नवा प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा, पटोले कृषी आघाडीवर
मृणालिनी नानिवडेकर / सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २८ ः कर्नाटकापाठोपाठ तेलंगणातही काँग्रेसला यश नजरेच्या टप्प्यात दिसत आहे. लोकसभेचा खरा सामना महाराष्ट्राच्या भूमीत होणार हे लक्षात घेत येथे मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता दिल्यास हा बदल होईल. तसेच सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेसच्या कृषी आघाडीचे राष्ट्रीय प्रमुख केले जाईल.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अथक परिश्रमाने काँग्रेस राज्यभर लढाऊ वृत्तीने वागत असला, तरी ग्रामपंचायत निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेता त्यांच्या जागी दुसरा चेहरा पुढे आणावा, तो मराठा असावा असा प्रवाह पुढे आला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष नेमले जाण्याची दाट शक्यता असून नाना पटोले यांना शेतीविषयीचा त्यांचा अभ्यास आणि आक्रमक स्वभाव लक्षात घेता कृषी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष केले जाईल. गेले काही दिवस पटोले यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यामुळे त्यांच्यावर खास प्रेम असलेले ज्येष्ठ नेते राहुल गांधी या बदलास मान्यता देतील काय, याबद्दल काहीशी साशंकता आहे. तरी काँग्रेस संस्कृतीत रुजलेला ज्येष्ठ मराठा प्रदेशाध्यक्ष असावा असा विचार पुढे येतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाभारतात सर्व बाजूंनी शक्तिमान असलेला नेता राज्याचा प्रमुख असावा, असा विचार जोर घेतो आहे.
गेल्या आठवड्यात नागपुरात काँग्रेस महासचिव अविनाश पांडे यांच्या मुलाच्या विवाह समारंभात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी महाराष्ट्राबद्दल चर्चा केली. या वेळी नाना पटोले दौऱ्यावर असल्याने गैरहजर होते. महाराष्ट्रातील ४८ जागांबाबत सविस्तर पाहणी करणारा अहवाल काँग्रेस मुख्यालयाने तयार केला आहे. यानुसार काही बदल करणे गरजेचे आहे असे बोलले जाते. नाना पटोले यांनी ओबीसी समाजावरील अन्यायाबद्दल कायम ठाम भूमिका घेतली आहे. त्याचा पक्षाला फायदाच झाला आहे; मात्र आता वडेट्टीवार हेही ओबीसी नेते सक्रिय झाल्याने बदलाचे वारे वाहू लागले आहे. विरोधी पक्षनेतेपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्याचा मानस होता, परंतु त्यांनी त्या वेळी हे पद स्वीकारण्यास नम्र नकार दिला होता. बाळासाहेब थोरात हे सर्वांना सांभाळून घेणारे नेते आहेत; मात्र नवी घडी बसवताना त्यांच्या जागी विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी यशोमती ठाकूर यांची निवड होण्याचीही शक्यता आहे.
दलित-मराठा-ओबीसी
मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नेमणूक करत दलित समाजाला न्याय दिला गेला आहे. वडेट्टीवार हे ओबीसी समाजातले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता एकाच समाजातील असण्याऐवजी मराठा समाजाला सोबत ठेवणे काँग्रेस नेतृत्वाला आवश्यक वाटत आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. २९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी सर्व प्रमुख नेते दिल्लीत एकत्र येत आहेत. तेथे या बदलावर चर्चा होईल. खरगे यांना काँग्रेस कार्यकारिणीत काही बदल करायचे असून रमेश चेन्नीथला यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय के. सी. वेणुगोपाल यांच्यासमवेत आणखी एखादी ज्येष्ठ व्यक्ती पक्षाच्या कारभारात सक्रिय असावी, असे खरगे यांना वाटत आहे. त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ हा मोठा कार्यक्रम होणार असून काँग्रेसचा दलित, मुस्लिम, आदिवासींचा तारणहार चेहरा यानिमित्ताने समोर आणण्याचे प्रयत्न आहेत. या पुस्तकाच्या निर्मितीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी मोठी भूमिका निभावली आहे.
दोन्ही गट सक्रिय
उघडपणे यासंदर्भात कुणीही कोणतीही भूमिका घेत नसले, तरी पटोले हे बाहेरून आले आहेत. नको तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला अडचणीत टाकले, असे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणतात; तर अशोकराव चव्हाणांनी विधिमंडळातील मतदानाला उशीर करून कुण्या ‘महाशक्ती’ला तर संकेत दिले नाहीत ना, असा प्रश्न दुसरा गट करतो आहे. कोल्हापुरातील सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावे असाही प्रस्ताव होता, पण त्यांनी त्याबद्दल अद्याप उत्सुकता दाखवली नसल्याचे समजते. संग्राम थोपटे आणि कुणाल पाटील या दोन नेत्यांवरील जबाबदारी लवकरच वाढवली जाणार असल्याचेही समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.