कामण आश्रमशाळेत परिसरातील
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची सुविधा
विरार (बातमीदार) : कामण आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, तसेच कामण विद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्वी जूचंद्र व कोल्ही येथे १० वी बोर्डाच्या परीक्षेसाठी जावे लागत असे. या परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी असल्याने लांबचा प्रवास, प्रवास खर्च, वेळ या गोष्टींमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांची तारांबळ उडत असे. कामण आश्रमशाळेची व्यवस्थापन समिती, तसेच मुख्याध्यापक पाटील यांनी सरकारकडे परीक्षा केंद्र मंजूर करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करून परीक्षा केंद्र मंजूर करून घेतले. दहावीचा पहिला पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे कामण आश्रमशाळेतर्फे स्वागत करण्यात आले. या वेळी शाळेचे चेअरमन केदारनाथ म्हात्रे, पो. बे. आश्रमशाळेचे चेअरमन प्रकाश देवळीकर, सामाजिक कार्यकर्ते अस्लम शेख, देवदळचे माजी सरपंच कमलाकर जाधव, माजी प्रभारी सरपंच दिनेश म्हात्रे, मुख्याध्यापक महेंद्र शिंदे, मुख्याध्यापक धनंजय भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कामण विद्यालयाचे १३२, आश्रमशाळेतील ८५, तर कामण विद्यालयाचे ७५ विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत.
---
विरारमध्ये सामाजिक संस्थांचा मेळावा
विरार (बातमीदार) : सामाजिक कार्यकर्ते व त्यांच्यात असलेल्या ऋणानुबंधामुळे निर्माण झालेला विश्वास टिकून राहील, यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या परिघाबाहेर जाऊन वेगवेगळ्या सामाजिक कार्याबद्दल माहिती मिळवली पाहिजे. या उद्देशाने विरारमध्ये जुने विवा कॉलेज येथे ३५ सामाजिक संस्थांच्या विश्वस्त, कार्यकर्ते यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात अभिनव प्रकल्पासाठी मोहन फाऊंडेशन आणि प्रभावशाली प्रकल्पासाठी माया केअर फाऊंडेशन यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील, विशेष पाहुणे म्हणून भारती पवार आणि विवा कॉलेजच्या उपप्राचार्य प्राजक्ता परांजपे उपस्थित होत्या.
---
जूचंद्र केंद्रावर विद्यार्थ्यांचे स्वागत
विरार (बातमीदार) : जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. ज्युनिअर कॉलेज, जूचंद्र तालुका वसई या ठिकाणी दहावीच्या परीक्षेसाठी ५८२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. शुक्रवारी (ता. १) परीक्षेच्या पहिल्या दिवशी सर्व परीक्षार्थींचे शाळा व्यवस्थापन कमिटी व शिवछत्रपती समाजसेवा मंडळ यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य, विनय गोपीकिसन पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष विवेकानंद पाटील, सदस्य जितेंद्र भोईर, निवृत्ती म्हात्रे, शिवछत्रपती समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष किरण म्हात्रे, मिलिंद पाटील, मुख्याध्यापक विलासराव जगताप व केंद्रप्रमुख नाडेकर आदींनी परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
---
शिवसेनेच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन
वाडा (बातमीदार) : ठाकरे गटाचे वाडा शहर शाखेच्या वतीने विनामूल्य दोन दिवसीय महाआरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे महाआरोग्य चिकित्सा शिबिर दोन टप्प्यांत राबविण्यात आले. एस. एम. बी. टी. हॉस्पिटल, घोटी यांच्या विद्यमाने विविध आजारांवरील १०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील महाआरोग्य शिबिर आयडियल मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विद्यमाने राबविण्यात आले. विविध आजारांवरील आयुर्वेदिक पद्धतीनुसार त्यावरील उपचार व औषधे मोफत देण्यात आली. वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना २० व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या मशीनचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला माजी आमदार रुपेश म्हात्रे, उपनेत्या ज्योती ठाकरे, भिवंडी ग्रामीणचे जिल्हाप्रमुख विश्वास थले, पालघर लोकसभा संपर्क प्रमुख नीलेश गंधे, विकास मोरे, राजेंद्र पाटील, दशरथ पाटील आदी उपस्थित होते.
---
कऱ्हे-तलावली येथे साकवाचे भूमिपूजन
विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील कऱ्हे-तलावली येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साकवाचे भूमिपूजन भाजप विक्रमगड विधानसभा प्रमुख डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था आहे. त्याचप्रमाणे बहुतेक गावातील नागरिक
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची व साकवांची मागणी होती. डॉ. हेमंत सवरा यांनी याबाबतीत लक्ष देऊन ही कामे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालघर जिल्हा पालकमंत्री यांच्याकडून मंजूर करून आणली. त्या कामांपैकी कऱ्हे-तलावली स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साकवाचे भूमिपूजन सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य सुभाष भोये, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश देवळे, भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश आळशी, भाजप जिल्हा चिटणीस जयप्रकाश आळशी, तालुका संघटक सरचिटणीस निशिकांत संखे व कार्यकर्ते उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.