निसार अली : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : शिकण्याची आवड असूनही कधी आर्थिक परिस्थिती, तर कधी घरच्या विरोधामुळे अनेक मुलींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. मालवणी येथील रहनुमा सिद्दिकी हिच्या आयुष्यातही दहावीच्या परीक्षेवेळी २००८ मध्ये असेच काहीसे घडले. तेव्हा तिचे हॉल तिकीटही आले होते. परीक्षेची तयारीही झाली होती. मात्र, अचानक लग्नाचे स्थळ आल्याने कुटुंबीयांच्या आग्रहामुळे तिला परीक्षेला जाण्याऐवजी लग्नमंडपात बसावे लागले. मात्र, मनातून शिक्षणाची जिद्द तिने कायम ठेवली होती. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारी रहनुमा अखेर १६ वर्षांनंतर सोमवारी दहावीचा पहिला पेपर देणार असून आपले अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकणार आहे.
लग्न झाल्यानंतर रहनुमा ही चेन्नईला गेली. तिथे तिने शिक्षणाचा ध्यास कायम ठेवला. शिक्षण पूर्ण करू द्यावे म्हणून तिने पती आणि सासऱ्यांकडे आग्रह धरला. मात्र, तिची ही मागणी मान्य झाली नाही. ती चार मुलांची आई झाली तरी तिने आपले शिक्षणाचे स्वप्न सोडले नाही. शिक्षणासाठी तिच्या आग्रहामुळे तिला पती आणि दीराकडून सातत्याने मारहाण आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर २०२३ ला ती सासरचे घर सोडून मुंबईत माहेरी परतली. तिचा हा निर्णय तिच्या वडिलांनाही आवडला नाही. त्यांनी तिला परत सासरी पाठवण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने त्यास नकार देत शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. यात तिला ‘सफल विकास वेल्फेअर सोसायटी’ची साथ मिळाली. संस्थापक वैशाली महाडिक यांनी धीर देत स्कील डेव्हलपमेंटमध्ये कोर्स करण्याची संधी दिली. त्यानंतर हेअर ड्रेसरचा कोर्सही पूर्ण केला. हे करत असताना दहावीची परीक्षा देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खासगी शाळेतून अर्ज भरला. ती उद्या दहावीची परीक्षा देणार आहे.
-------
स्वतःच्या पायावर उभी राहून मी माझे आणि मुलांचे भविष्य सुधारणार आहे. आता मी उच्च शिक्षण घेणार आहे.
- रहनुमा. एम. सिद्दिकी
...
आम्ही रहनुमाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतोय. स्कील डेव्हलपमेंटचे दोन अभ्यासक्रम पूर्ण केले. तिचा दहावीचा निकाल येईल, तेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी राहील.
- वैशाली महाडिक, संस्थापक, सफल विकास वेल्फेअर सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.