सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पालिकेमार्फत आरोग्य सेवा आणखी सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (एचएमआयएस) प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार असल्याने सुविधांसाठीचा प्रतीक्षा कालावधीदेखील कमी होणार आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी लागणाऱ्या कालावधीमुळे रुग्णांसह नातेवाइकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर रुग्णांची नोंद, डॉक्टरांचा सल्ला घेणे, आवश्यक असल्यास निदान चाचणी करणे, त्यानंतर औषधालयाच्या माध्यमातून औषध उपलब्ध करून देणे, अशी सर्व प्रक्रिया अनेकदा वेळखाऊ ठरते. या अनुषंगाने आता महापालिकेचे दवाखाने, रुग्णालयांमध्ये ही प्रणाली कार्यरत केली जाणार आहे. या प्रणालीमुळे कोणत्याही दवाखाना किंवा रुग्णालयात याआधी उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, तसेच भविष्यात दुर्धर आजारांमध्ये टेली कन्सलटन्सीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.
-----------------------------------------------
‘एचएमआयएस’प्रणालीची रूपरेषा
प्रकल्प अभ्यास, हार्डवेअर आणि नेटवर्किंग सर्वेक्षण, प्रकल्प आराखडा तयार करण्यात येईल. त्यासोबतच प्रकल्पासाठीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने वितरण, यंत्रणेची चाचपणी, डिझाईन, विकास आणि एचएमआयएस ॲप्लिकेशनची अंमलबजावणी आदी बाबींवर काम करण्यात येईल. त्यानंतर विद्यमान प्रणालीअंतर्गत असणाऱ्या रुग्णांशी संबंधित माहितीचे हस्तांतर एचएमआयएस प्रणालीअंतर्गत करण्यात येईल.
--------------------------------------------
रुग्णांसाठी उपयुक्त
एखाद्या रुग्णाने दुसऱ्या रुग्णालयात घेतलेल्या उपचाराची माहिती मिळण्याठीही या प्रणालीचा वापर करण्यात येईल. या प्रणालीच्या वापराने रुग्णांना विनासायास सेवा प्राप्त करणे शक्य होईल. रुग्णालयात केस पेपरसाठीची रांग कमी करण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करणेही या प्रणालीमुळे शक्य आहे, तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांना उपलब्ध होणे शक्य होणार आहे. या सर्व बाबींसाठी प्रणालीचा वापर सहजरीत्या करता येईल. रुग्णांशी संबंधित विभागाअंतर्गत माहिती वहन प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
----------------------------------------------------
चार टप्प्यांमध्ये अंमलबजावणी
सॉफ्टवेअर आणि क्लाऊड प्रणालीचाही वापर या यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येईल, तसेच एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठविणे, तज्ज्ञांची वेळ घेणे, याचा समावेश आहे. यासोबत भविष्यात विविध संशोधनासाठी या प्रणालीची मदत होणार आहे. सर्व दवाखाने, सर्व प्रसूतिगृह, उपनगरीय रुग्णालये तसेच विशेष रुग्णालयाच्या ठिकाणी पुढच्या टप्प्यात यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येईल, तसेच शेवटच्या टप्प्यात सर्व महत्त्वाच्या रुग्णालयात ही यंत्रणा अंमलात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.