विरार, ता. ३० (बातमीदार) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. अन्य डाव्या व पुरोगामी पक्षांनीही आपला प्रभाव असलेल्या मर्यादित जागांची मागणी केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आपली भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती. आपण निवडणूक लढणार असणाऱ्या १२ मतदारसंघांची यादी लिखित स्वरुपात सादर केली होती. महाविकास आघाडीने या १२ जागा माकपला सोडाव्यात व त्यानंतरच उर्वरित जागांबाबत आपसात वाटाघाटी कराव्यात, अशी मागणी केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष माकप व डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागावाटपाबाबत आपसात चर्चा करत आहेत. अन्य डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना अद्याप या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे दिसत नाही. यापूर्वी लोकसभेला केलेली चूक पुन्हा एकदा आघाडीतील तिन्ही पक्ष करत असल्याचा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत राज्यातील सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष, पुरोगामी संघटनांना महाविकास आघाडीने तातडीने सामावून घ्यावे. निवडणुकीबद्दल त्यांचे मत विचारात घेतले जाऊन सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मात्र तसे झाले नाही तर सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्यांची असेल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.