नव्या संगणकीय प्रणालीचा पालिकेला मनस्ताप
ऑनलाइन पेमेंटच्या यंत्रणेत त्रुटी
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : सरकारने लागू केलेली नवीन संगणकीय प्रणाली तांत्रिक अडचणींमुळे वादात सापडली आहे. नवी प्रणाली कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी आणि करदात्या नागरिकांसाठी मनस्ताप देणारी ठरली आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे ही प्रणाली अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे मालमत्ताकराची बिले जनरेट करताना, तसेच ऑनलाइन मालमत्ता कर भरणा करताना करदाते आणि पालिका कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. या प्रणालीत अनेक त्रुटी निर्माण होत असल्याने पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाले आहेत.
कुळगाव- बदलापूर नगर परिषदेत मायनेट या प्रणालीच्या माध्यमातून कर आकारणी केली जात होती; मात्र राज्य सरकारने आयडब्ल्यूबीपी या नव्या ऑनलाइन प्रणालीनुसार कर आकारणी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगर परिषदेच्या कर आकारणी व वसुली विभागाने १५ मे २०२३ पर्यंतच्या मायनेट प्रणालीतील, संपूर्ण डेटा इनोव्हेट या कंपनीला आयडब्ल्यूबीपी या नवीन संगणक प्रणालीत स्थलांतरित करण्यासाठी उपलब्ध करून दिला; परंतु या प्रक्रियेत डेटा पोर्टिंग यशस्वीरीत्या न झाल्याने नोव्हेंबर २०२२च्या अखेरच्या आठवड्यात पुन्हा मायनेट संगणक प्रणाली चालू करून विभागाचे कामकाज सुरू केले. याद्वारे काही प्रलंबित कामांचा निपटारा १ एप्रिल २०२३ ते १४ मे २०२३ या कालावधीत केला. त्यानंतर पुन्हा नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या आदेशानुसार १५ मे २०२३ रोजी मायनेट संगणक प्रणाली बंद करून संपूर्ण डेटा महायूएलबी या संगणक प्रणालीत स्थलांतरित करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आला.
पुढे जुलै २०२३च्या अखेरच्या आठवड्यात डेटा पोर्टिंग करून नवीन सॉफ्टवेअर चालू करून मिळाले; मात्र आजतागायत ही संगणक प्रणाली चालू नसल्याने दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे करवसुली वाढवण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, नगर परिषदेच्या महसुली उत्पनावर परिणाम होत आहे.
ऑनलाइन पेमेंटची वेबसाईट बऱ्याचदा बंद स्थितीत असल्याने व सततच्या सर्व्हर डाऊनच्या समस्येने २०२३-२४ मध्ये मालमत्ता कराची वसुली दोन कोटी ७९ लाख ३१ हजार ६९१ इतक्या कमी प्रमाणात झाली आहे. ती ऑनलाइन वसुली मायनेट संगणक प्रणालीत २०२२-२३ मध्ये ११ कोटी ५१ लाख ६३ हजार ५७४ इतकी झालेली होती. ही सगळी स्थिती आणि समस्या पाहता कुळगाव- बदलापूर नगर परिषद प्रशासनाने हे सॉफ्टवेअर बदलून नवीन द्यावे, अथवा नगर परिषदेला नवीन सॉफ्टवेअर घेण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती नगर परिषद संचालनालय आयुक्तांना पत्राद्वारे केल्याची माहिती पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीही अनेकदा नगर परिषद प्रशासनाने यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार केला आहे; मात्र अजूनही या समस्या कायम असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांना कारणे देताना दमछाक
नवीन संगणक प्रणाली अत्यंत धीम्या गतीने चालत आहे. १० ते १५ मिनिटांनी एक कर पावती जनरेट होते. त्यात अनेकदा सर्व्हर हँग होते, नवीन मालमत्ता नोंद न करता येणे व त्यांची बिले जनरेट न होणे, ऑनलाइन मालमत्ता कर वसुलीची बिले जनरेट न होणे, संगणक प्रणालीमधे सक्सेस व फेल ट्रान्झेक्शन स्टेटस दिसूनही, कर पावती जनरेट न होणे, संगणक प्रणालीत ऑनलाइन मालमत्ता करवसुली करताना अडथळे येतात. मालमत्ता पुनर्विलोकन प्रणाली विकसित नसणे, ट्रान्झेक्शन फेल होणे, अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. त्याशिवाय मालमत्ता कर भरूनही अनेकांना बिल न भरल्याप्रमाणे दंडासह बिले येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.