नवरात्रीसाठी मुंबादेवी सज्ज
मंदिर व्यवस्थापनाकडून जय्यत तयारी; सजावटीचे काम पूर्ण
दिनेश चिलप मराठे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबादेवी, ता. ३० (बातमीदार) ः पायधुनी भुलेश्वर येथील चारशे वर्षे पुरातन असलेल्या मुंबादेवी मंदिरात गुरुवारपासून (ता. ३) शारदेय नवरात्री उत्सवास प्रारंभ हाेत असून मंदिर व्यवस्थापनाने उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. मंदिराची रंगरंगोटी आणि सजावटीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
गुरुवारी दुर्गादेवीच्या आराधनेसाठी घटस्थापना होणार आहे. आदिशक्ती महिषासूरमर्दीनीचा जागर घराघरात आणि चराचरात होणार आहे. अश्विन शुद्ध पक्ष प्रतिपदेला शारदेय नवरात्रीस आरंभ होऊन नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणाऱ्या हजारो महिला भाविकांची मुंबादेवीच्या दर्शनाची आस गुरुवारी पूर्ण होणार आहे. गुरुवारी पहाटे ५.३० वाजता मंदिर उघडणार असून देवीची षोडशोपचारांनी पूजन करण्यात येऊन मंगल आरती होईल. त्यानंतर सकाळी सात ते आठच्या दरम्यान मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना होईल. नवरात्रीत सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री १० वाजेपर्यंत दर्शन रांगा सुरू असतील. मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी पाणपोई उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदा नवरात्रीत अवघा एकच रविवार आल्याने जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविक दर्शन सोहळ्याचा लाभ घेतील, असे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सांगितले. भाविकांच्या मदतीसाठी एक डॉक्टर, ॲम्ब्युलन्स आणि स्टाफ यांची वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल.
मंदिर व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी मंदिराच्या परिसरातील फेरफटका मारून भाविकांच्या दर्शन रांगेसाठी बांधण्यात येणाऱ्या भव्य मंडपाचे निरीक्षण करीत काही सूचना केल्या आहेत.
मुंबादेवी मातेशेजारीच अन्नपूर्णा माता आणि हनुमंत यांच्या मूर्ती आहेत. या देवीची समंत्र षोडशोपचारांनी दिवसातून सहावेळा पूजा-अर्चना होते. विद्युत स्वयंचलित ढोल-ताशा वाजवीत मुंबादेवीची आरती होते. देवीची पूजा, आरती, देवीला प्रसाद अर्पण, विडा तांबूल अर्पण हे सर्व विधी करण्यासाठी १६ पुजारी कार्यरत आहेत. मुंबादेवी मातेला उत्सवाच्या काळाव्यतिरिक्त प्रतिदिन भात, भाजी आणि मिठाई यांचा प्रसाद अर्पण केला जातो.
संध्याकाळी आरतीनंतर पुजाऱ्यांच्या देखरेखीखाली मंदिर स्वच्छता करून कपाट बंद करतात. दररोज पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे द्वार उघडले जाते. मंदिराच्या कळसावर एक विजयी ध्वज असून दर महिन्याला हा जुना ध्वज काढून नवीन लावण्यात येतो. चैत्रपाडव्याला हिंदू नववर्षाला मुंबादेवीला विविध आंबाफळाचा साजशृंगार करण्यात येतो. वर्षभर त्यात्या ऋतूफळांचा साज मुंबादेवीला साकारण्याची परंपरा आजही कायम आहे, असे हेमंत जाधव यांनी सांगितले.
मंदिरात मार्कंडेय पुराणविरचित देवी सप्तशतीचा समंत्र पाठ, ललिता पंचमीला दीपोत्सव आणि अष्टमीला विधिवत होमहवनचा कार्यक्रम होणार आहे. मुंबादेवीला महाप्रसाद म्हणून सात्विक उपवासाचा फराळ असतो. साबुदाण्याची खिचडी, राजगिरा पुरी, पोहे आणि श्रीखंड, असा प्रसाद अर्पण करण्यात येतो.
मुंबादेवी मंदिर हे पायधूनी-भुलेश्वर तांबाकाटा परिसरात वसलेले आहे. या परिसरात झव्हेरी बाजार, दागिना बाजार, कापड मार्केट, स्टोव्ह मार्केट, तांबा-काटा स्टील मार्केट असा मोठा व्यावसायिक आर्थिक देवाणघेवाण असलेला विभाग आहे. या ठिकाणी येऊन मनापासून दर्शन घेणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची आस्था आहे.
मुंबादेवी मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने येथे दिवसरात्र २४ तास अत्याधुनिक शस्त्रधारक सशस्त्र पोलिसांचा जागता पहारा असतो. भाविकांची मेटल डिटेक्टरने तपासणी करूनच त्यांना दर्शन रांगेने आत सोडले जाते.
४०० वर्षांहून जुने मंदिर
मुंबईतील कोळी बांधवांनी ४०० वर्षांपूर्वी मंदिर बांधून मुंबादेवीची स्थापना केली. या मंदिराला पांडू शेठ नामक व्यक्तीने जमीन दान दिली. कोळी, आगरी आणि भंडारी समाज बांधवांची मुंबादेवीवर अपार श्रद्धा होती. मुंबादेवी खवळलेल्या समुद्रापासून आपल्या कुटुंबाचे आणि मुंबईचे रक्षण करते, अशी मच्छीमारांची ठाम श्रद्धा होती. आजही या श्रद्धेपोटी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा करीत वाद्याच्या गजरात नाचत गात देवीच्या भेटीस पालखी घेऊन येतात.
देशभरात भाविक
देशभरातून, तसेच परदेशी पर्यटक मुंबादेवीच्या दर्शनाला आवर्जून हजेरी लावतात. मुंबादेवीची बर्फी आणि पेढे फार प्रसिद्ध आहेत. मिठाई आणि हार फुलांची दुकाने, धार्मिक पुस्तकांची दुकाने, शंख, रुद्राक्ष माळा, रंगीत दोरे, तांबे आणि पितळ यापासून निर्मित देवी-देवतांच्या लहान मोठ्या मूर्तींचे स्टॉल्स, हातात रक्षा सूत्र बांधणारे उत्तर भारतीय पंडित यांचा येथे मोठा वावर असतो. मुंबईकर मराठी भाषिक, यूपी, एमपी, बिहार आणि देशाच्या विविध भागातून आलेली लोकं येथे व्यवसाय करून पोट भरतात.
भाविकांसाठी येथे उत्तम व्यवस्था केली आहे. चैत्र नवरात्री, आषाढ गुप्त नवरात्री, अश्विन शारदेय नवरात्री आणि माघ गुप्त नवरात्री, अशा चार नवरात्री उत्सवात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. नवरात्रीत दररोज २४ ते २५ हजार भाविक दर्शनाला येतात. त्यात सुट्टी आणि रविवार आल्यास लाखाे भाविक येतात.
- हेमंत जाधव, मुंबादेवी मंदिर व्यवस्थापक
नवरात्रीत नऊ दिवस फार गर्दी असल्यामुळे आम्ही दोन दिवस आधीच देवीचे दर्शन घेतो. दसऱ्याला शक्य झाल्यास आम्ही पुन्हा दर्शनाला येणार आहोत. मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केल्यामुळे आज गर्दी असूनही दर्शन सोहळा उत्तम पार पडला.
- संगीता गायकवाड, भाविक
चोख सुरक्षा व्यवस्था
मंदिर प्रशासनाकडून ७० ते ७५ सुरक्षा रक्षक आणि १५० स्वयंसेवकांची खास टीम भाविकांच्या मदतीसाठी कार्यरत झाली आहे. ४० सीसीटीव्ही कॅमेरे, बॅक स्कॅनर मुख्य प्रवेशद्वारावर कार्यरत आहेत. लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. क्विक रिस्पॉन्स टीम, महिला पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
भाविकांनी सहकार्य करावे
दर्शन रांगेत असताना मोठ्या बॅगा सोबत आणू नयेत. सोबतच्या लहान मुलांची काळजी घ्यावी. आपल्या अंगावरील दागिन्यांची काळजी घ्यावी. काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी भाविकांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.