मुंबई शहरमधील दहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
एकूण २५ लाख ३६ हजार मतदार; २ हजार ५३७ मतदान केंद्रे
मुंबई, ता. २२ : मुंबई शहर परिसरामध्ये येणाऱ्या धारावी, सायन, कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. याबाबतची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी मंगळवारी (ता. २२) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यादव यांनी सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, भयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले. मतदान केंद्रावर मतदारांना अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, टोकन सिस्टीम याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती व्हावी, यासाठी बीएलओमार्फत घरोघरी मतदारचिठ्ठीचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र हा अभिनव उपक्रम मुंबई शहर जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ. जोशी म्हणाल्या, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधा पुरविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
-
मनुष्यबळ
मुंबई शहर जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघ असून एकूण दोन हजार ५३७ मतदान केंद्रे आहेत. या मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे दोन हजार ५३७ बीएलओ आहेत. एकूण ३६४ क्षेत्रीय अधिकारी आहेत. जवळपास १२ हजार ५०० पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.
मुंबई शहर जिल्ह्याबाबत माहिती
एकूण मतदान केंद्र - दोन हजार ५३७
- उत्तुंग इमारतीमधील मतदान केंद्र - १५६
- सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील मतदान केंद्र - १००
- झोपडपट्टी परिसरात मतदान केंद्र-३१३
- मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्र-७५
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
धारावी- दोन लाख ६१ हजार ०१२
सायन-कोळीवाडा- दोन लाख ८१ हजार ४६२
वडाळा - दोन लाख पाच हजार १२
माहिम- दोन लाख २५ हजार ४१५
वरळी - दोन लाख ६३ हजार ६९७
शिवडी- दोन लाख ७४ हजार ४७२
भायखळा- दोन लाख ५८ हजार १२
मलबार हिल - दोन लाख ६० हजार ६७२
मुंबादेवी - दोन लाख ४१ हजार ४५४
कुलाबा - दोन लाख ६४ हजार ९३१
अशी एकूण २५ लाख ३६ हजार १३९ मतदार संख्या आहे
- महिला – ११ लाख ७२ हजार ९४४
-पुरुष- १३ लाख ६२ हजार ९५१
-तृतीयपंथी- २४४
-ज्येष्ठ नागरिक (८५+) ५४ हजार ०३३
-नवमतदार संख्या (१८-१९ वर्ष) ३८ हजार ३२५
-दिव्यांग मतदार – सहा हजार ३४४
-सर्व्हीस वोटर – ३९२
-अनिवासी भारतीय मतदार - ४०६
तक्रारींचा निपटारा
१५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सी-व्हिजिल ॲपवर एकूण १४ तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, तर NGSP पोर्टलवर १०१ तक्रारी प्राप्त झाल्या असून ६७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.