परप्रांतीयांमुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा
पेणमधील नाका कामगारांचा आरोप; शासनाने लक्ष देण्याची मागणी
पेण, ता. १७ (वार्ताहर) : मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पेणच्या विकासात मागील काही वर्षांपासून वाढ झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे वाढली आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून येथे नाका कामगारांची संख्या वाढली आहे. हाताला काम मिळावे यासाठी येथील गाव-पाड्यातील, तसेच आदिवासी बांधव शहरातील नाक्यावर हजेरी लावतात, मात्र गेल्या काही महिन्यांपासून परप्रांतीय कामगारांची संख्या सर्वाधिक वाढली असल्याने स्थानिकांच्या पोटावर गदा आली आहे. शासनाने स्थानिक नाका कामगारांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नाका कामगारांनी केली आहे.
तालुक्यातील वाशी, शिर्की, वडखळ, पाबळ, कुरनाड, जिर्णे, कोंडवी, वरवणे, गागोदे यासह डोंगराळ भागात असणाऱ्या आदिवासी वाड्यांतील अनेक आदिवासी महिला, तसेच पुरुष मंडळी पहाटेच शहराकडे कामासाठी येत असतात. गागोदे, वाकरुळ जिते, खारपाडा या भागातूनही दररोज जवळपास ५०० ते ६०० कामगार येतात, मात्र या कामगारांमध्ये परप्रांतीय कामगारांचा वाटा मोठा असल्याचे दिसून येत आहे. परप्रांतीय कामगारांमध्ये गवंडी, मेस्त्री, रंग काम करणारे पेंटर, इलेक्ट्रिशन अशांचा अधिक भरणा आहे. त्यामुळे त्यांना सर्वाधिक कामे मिळतात. त्यामुळे ते उदरनिर्वाहसाठी पहाटे पाच ते सहा वाजल्यापासून पेण नगरपालिकेसमोरील नाक्यावर येऊन थांबतात, तर आपल्या हाताला मिळेल ते काम करण्यासाठी धडपड करीत असणारे गाव-खेड्यातील कामगार लांब पल्ल्यातून येत असल्याने त्यांना एसटीने तर काही वेळेला खासगी वाहनाने जास्तीचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. दिवसभराची मिळणारी मजुरी पाहता आपल्यासह आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरणार, या विवंचनेत येथील स्थानिक नाका कामगार आहेत. परप्रांतीय कामगारांमुळे आमच्या रोजगारावर घाला बसत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
............................
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोज सकाळी एसटीने अथवा खासगी वाहनाने प्रवास करत आम्ही शहराच्या नाक्यावर येत आहोत. त्यातच परप्रांतीय कामगारांचा भरणा जास्त वाढत असल्याने आता आम्हाला कामे कमी मिळायला लागली आहेत.
दत्तू शिमगा, नाका कामगार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.