सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आमदार बदलीचा पायंडा बदलण्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांना यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले भोईर यांना येथून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पक्षातूनच त्यांच्यासमोर नाराज कार्यकर्ते आणि बंडखोरीचे आव्हान उभे राहिले. या नाराजीमुळे शिंदे यांच्या हातून हा गड जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भोईर यांनी सर्व नाराजीचे अडथळे दूर करत कल्याण पश्चिमेतील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या मतदारसंघाचा पायंडा आपण बदलू, असे वक्तव्य त्यांनी निवडणुकीआधी केले होते. ते विधान सार्थ ठरवत त्यांनी विजय मिळवत या भागाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाले आहेत.
निवडणूक जाहीर होताच कल्याण पश्चिमेतून उमेदवारी मिळावी म्हणून शिंदे गटाचे भोईर यांच्यासह प्रमुख दावेदार म्हणून रवी पाटील इच्छुक होते. तर भाजपमधून नरेंद्र पवार, वरुण पाटील हे इच्छुक होते. मागील निवडणुकीत भोईर यांना पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून समझोतामधून उमेदवारी दिली होती. त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना आता प्रभागात काम जमत नाही, असे म्हणत शिंदे गटातून जोरदार विरोध होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांची खंबीर साथ असल्याने पहिल्या यादीतच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर भोईर यांना महायुतीमधील बंडखोरांकडून आव्हान उभे राहिले होते. भाजपचे नरेंद्र पवार आणि वरूण पाटील, सेनेचे अरविंद मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. रवी पाटील हेदेखील उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते. पक्षातील वरिष्ठांनी दम भरताच मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. रवी पाटील यांनीही भोईर यांचे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला; मात्र पाटील हे रिंगणात होते. कपिल पाटील यांचे मन वळवून वरूण यांचा पाठिंबा मिळवण्यात भोईर यांना यश आले.
भोईर यांच्या विजयाने कल्याण पश्चिमेतील आमदार बदलीचा पायंडा पुसला गेला आहे. मतदारांनी कायम वेगवेगळ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. येथे आतापर्यंत कोणही एक आमदार दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. भोईर यांनी येथील पायंडा बदलून इतिहास घडवू, असे विधान केले होते. ते सार्थ ठरवत त्यांनी विजय प्राप्त केला आहे.
बासरेंचे आव्हान
निवडणूक आल्यानंतर आमदार भोईर यांनी अनेक विकासकामे शहरात केली. पण त्यांच्याविषयी शिवसैनिक, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. या नाराजीचा भोईर यांना फटका बसेल असे बोलले जात होते. त्यातच त्यांच्यापुढे ठाकरे गटाचे सचिन बासरे यांचे आव्हान होते. अभ्यासू, उच्चशिक्षित उमेदवार म्हणून बासरे यांनी भोईर यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मुस्लिमबहुल भागातील मते, भाजपची नाराजी, मतांची विभागणी, मनसेची विभागली जाणारी मते या सर्व शक्तीच्या बळावर बासरे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मुख्यमंत्र्यांचा उमेदवार म्हणून भोईर यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे मतचाचणीत गडबड झाली, तर पालिका निवडणुकीत त्याची किंमत मोजायला लागेल या विचाराने महायुतीमधील सर्व कार्यकर्ते, नाराज झटून कामाला लागले. भोईर यांनी एक लाख २६ हजार २० मते मिळवून ४२ हजारांचे मताधिक्य मिळवले. तर सचिन बासरे यांनी तब्बल ८३ हजार ४६६ मते घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.