माणगाव बायपासच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी
माणगाव, ता. ७ (वार्ताहर) ः मुंंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचे काम अपूर्णावस्थेत असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या बायपासचे काम रखडल्याने कोकणवासीयांचे हाल होत असून, ही वाहतूक कोंडी दूर करण्यात महामार्ग प्रशासनाला अपयश येत आहे. याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रायगड प्रेस क्लब २६ जानेवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता यांना रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मनोज खांबे यांनी निवेदन दिले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे रायगड जिल्ह्यातील ८५ टक्के काम पूर्ण झाले असले, तरी या महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बायपासचे काम रखडले आहे. १३ ते १४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजतागायत १०० टक्के पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दर शनिवार आणि रविवारची आठवडी सुट्टी, तसेच वर्षभरात येणारे महत्त्वाचे सण आणि वर्षाखेरीस येणारे पर्यटक यामुळे माणगावपासून वडपालेपर्यंत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे मुंबई, तसेच कोकणातून दोन तासात येणाऱ्या वाहनांना माणगाव ते वडपाले हे १५ ते २० किलोमीटर अंतर कापण्यासाठी तीन ते चार तास लागत आहेत. त्याबाबत रायगड प्रेस क्लब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महामार्गावर उतरून आंदोलन करीत आहे. महामार्गावरील इंदापूर आणि माणगावदरम्यान रखडलेल्या बायपासमुळे या भागात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे माणगाव शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. याचा गंभीर परिणाम माणगाव बाजारपेठेवरही झाला आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ग्राहक बाजारपेठेत येण्यास तयार नसतात. त्यामुळे व्यापारीवर्ग, तसेच छोटे मोठे व्यावसायिक यांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.