रोहा (बातमीदार) ः तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी पाच वर्षांपासून विभागातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. पाण्यासाठी संबंधित कार्यालयात खेटा मारल्या, आंदोलन केले, प्रसंगी उपोषणाला बसले, तरी कालव्याला पाणी नाही. पाण्यावाचून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे यंदातरी प्रशासनाला पाझर फुटणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. दुसरीकडे पाण्यासाठी बळीराजा फाउंडेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ६) पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेत समस्या मांडल्या. या पाणी समस्याकडे लक्ष न घातल्यास दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बळीराजा फाउंडेशनने दिला आहे.
आंबेवाडी ते निवीपर्यंत असलेल्या कालव्यातील पाणी मिळावे म्हणून संस्थेने गतवर्षी आक्रमक पवित्र घेतल्याने काही भागात कालवा दुरुस्तीची कामे झाली. या कामासाठी लाखो रुपये खर्चही करण्यात आले, पण ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने लांढर गावाजवळ कालव्याचा बांध फुटल्याची घटना गतवर्षी घडली असून, कालवा दुरुस्तीची कामे अद्याप प्रलंबित आहेत.
कालव्याच्या पाण्यामुळे आंबेवाडी ते निवी भागातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. कलिंगड, भाजीपाला लागवडीसह कुटीर उद्योगाला चालना मिळेल. पाण्याच्या स्त्रोत जिवंत होईल. गुरेढोरे, बागायतीचा प्रश्न सुटेल. लोकप्रतिनिधींनीही कालव्याचे पाणी मिळण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
पाण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार सुनील तटकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली. कालव्याची दुरुस्ती न झाल्याने पाणी सोडता येणार नाही, असे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती, साफसफाईच्या कामात दिरंगाई का होत आहे, याचे उत्तर दिले जात नाही. तळाघर सायपन, मोऱ्या दुरुस्तीची कामे कधी करणार, अशी विचारणा बळीराजा संस्थेचे सल्लागार राजेंद्र जाधव यांनी केली. पाच वर्षांपासून शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असून, पाण्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कालव्याच्या साफसफाईसाठी लाखोंचा खर्च
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. कालवा दुरुस्तीच्या नावाखाली आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. दरवर्षी कालवा साफसफाईसाठीही लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र पाणी मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
कालव्याला पाणी येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाताला रोजगार नसल्याने या ग्रामीण भागातील मंडळी दुबार शेती व कडधान्य पिकून उदरनिर्वाह करीत आहेत. म्हणून यंदा तरी कालव्याला पाणी सोडायला पाहिजे. कालव्याची कामे, वस्तुस्थिती मांडण्यासाठी प्रसंगी खासदार सुनील तटकरेंचीही भेट घेणार आहे.
- विठ्ठल मोरे, बळीराजा फाउंडेशन
कालवा दुरुस्तीची कामे तातडीने मार्गी लावू. सोमवारी अधिकारी वर्गाने कालव्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. कालव्यातील गाळ, कचरा काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्यात येईल.
- मिलिंद पवार, उपअभियंता, पाटबंधारे विभाग
रोहा : कालव्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाविरोधात शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.