पनवेल, ता. १८ (बातमीदार) : मालमत्ता कर न भरणाऱ्या आस्थापनांविरोधात कडक कारवाई करण्यास पनवेल महापालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार, थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा व वॉरंट बजावण्यास तसेच मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ज्या आस्थापनांचा मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकीत आहे, त्या आस्थापना पालिकेच्या रडारवर असून, काही दिवसांमध्ये त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात चारही प्रभागांमधील सुमारे तीन लाख ५० हजार मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे. यात ज्या आस्थापनांचा अधिक मालमत्ता कर देणे बाकी आहे, त्यांना जप्तीपूर्व नोटिसा व वॉरंट बजावण्यात येत आहेत. महापालिकेच्या पथकांनी आजपर्यंत चारही प्रभागांमध्ये एकूण ४४७ जप्तीपूर्व नोटिसांचे वाटप केले असून, २७ वॉरंट बजावण्यात आले आहेत. यामध्ये नुकतीच तळोजा येथील मे. वॉलरेक मॉड्यूलर सिस्टक कंपनीवरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिलपासून आतापर्यंत ३२६ कोटी इतकी वसुली झाली आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा एकमेव आर्थिक स्त्रोत असल्याने उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख, जप्ती पथकामधील अधिकारी, कर्मचारी करवसुलीसाठी अविरत काम करीत आहेत.
पथक अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांना कर भरणासाठी प्रवृत्त करून लवकरात लवकर कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. मालमत्ता कराचा भरणा न केल्यास जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कराच्या थकबाकीपोटी जंगम, स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करून जाहीर लिलावाने विक्री करून थकबाकी वसूल करण्याची तरतूद महापालिकेस आहे. त्यानुसार नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांना उपायुक्तांच्या सूचनेनुसार, कर अधीक्षक महेश गायकवाड व कर अधीक्षक सुनील भोईर यांच्या जप्ती पथकामार्फत खारघर, उपविभाग नावडे, कळंबोली, कामोठे, पनवेल व नवीन पनवेल प्रभागामधील थकबाकीदारांना जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेने मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.