ढोल-ताशांच्या गजरात करवसुली
उल्हासनगर पालिकेची मोहीम; १२८ नळजोडण्या खंडित, ३१२५ घरांना नोटिसा
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर): कर बुडवणाऱ्यांना यंदा अभय योजना राबवण्यात येणार नाही, तर पालिका थेट तुमच्या दारात ढोल-ताशांच्या गजरात करवसुली करणार आहे. उल्हासनगर महापालिकेने थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा धक्का आहे. यंदा कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नसल्याची अधिकृत घोषणा महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी केली आहे. परिणामी कर न भरल्यास सामाजिक दबाव निर्माण करण्यासाठी थेट ढोल-ताशांच्या गजरात वसुली मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती कर निर्धारक आणि संकलक अधिकारी नीलम कदम यांनी दिली.
करवसुलीसाठी आक्रमक पावले उचलत उल्हासनगर महापालिकेने थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. कर विभागाच्या प्रमुख अधिकारी नीलम कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील १० दिवसांत १२८ घरांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. ३१२५ घरांना वारंट पाठवले असून, ४८ जणांना त्यांच्या मालमत्तेवरील जप्ती (अटॅचमेंट) नोटिसा बजावल्या आहेत. तसेच केवळ १० दिवसांत २५ मालमत्तांवर २० लाख ५१ हजार १०७ रुपये कर वसूल केला आहे. आतापर्यंत दोन कोटी १९ लाख सात हजार १५ रुपयांची करवसुली पूर्ण झाली आहे.
कर संकलन वाढवण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी ३१ मार्चपर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार आणि रविवारही कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. करवसुलीचे विशेष पथक तयार केले असून, त्यांना दिवस-रात्र काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर न भरणाऱ्या नागरिकांवर दबाव टाकण्यासाठी उल्हासनगर महापालिका नव्या पद्धतीने पुढे सरसावली आहे. "जोपर्यंत कर भरला जात नाही, तोपर्यंत ढोल-ताशा वाजवून थेट थकबाकीदारांच्या घरासमोर वसुली मोहीम राबवली जाणार आहे" यामुळे सामाजिक दबाव निर्माण होईल. तसेच थकबाकीदारांना त्वरित कर भरण्यास प्रवृत्त केले जाईल. संपूर्ण शहरभरात ''घंटा गाडी''च्या माध्यमातून ऑडिओ क्लिप प्रसारित केली जात आहे, ज्यामध्ये "यंदा अभय योजना नाही आणि कर वेळेत न भरल्यास कठोर कारवाई होईल" असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
आर्थिक फटका
महापालिकेच्या कठोर धोरणामुळे थकबाकीदारांमध्ये मोठ्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांना अभय योजनेच्या माध्यमातून व्याजमाफीची अपेक्षा होती; मात्र ती यंदा मिळणार नसल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. गेल्या काही वर्षांत अभय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर कर संकलन झाले होते, पण यंदा ही संधी मिळणार नसल्याने नागरिकांना पूर्ण रक्कम व्याजासह भरावी लागणार आहे. महापालिकेच्या आक्रमक धोरणामुळे अनेक थकबाकीदारांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे; मात्र ३१ मार्चपर्यंत किती कर वसूल होतो. ही मोहीम किती प्रभावी ठरते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
करवसुलीबाबत मनपा कठोर भूमिका घेत असून, यंदा अभय योजना लागू केली जाणार नाही. गेल्या काही दिवसांत १२८ घरांच्या पाणीजोडण्या तोडल्या आहेत, ३१२५ घरांना वॉरंट आणि ४८ जणांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता कर भरावा, अन्यथा ढोल-ताशांच्या गजरात त्यांच्या दारात जाऊन वसुली केली जाईल. ‘घंटा गाडी’च्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे, वेळेत कर भरून कठोर कारवाई टाळावी."
नीलम कदम, कर निर्धारक आणि संकलन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.