आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवा
माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांची मागणी
विरार, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरार महानगरपालिकेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर खासगी रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या उपचारासाठी १० टक्के खाटा राखीव ठेवणे, त्याचे दर निश्चित करणे तसेच या प्रस्तावासाठी अर्थसंकल्पात नव्याने लेखाशीर्षाची तरतूद करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा)च्या माजी गटनेत्या आणि माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.
किरण चेंदवणकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात लिहिले आहे की, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या पाहता महानगरपालिकेचे सर्व सोयीसुविधांयुक्त अद्ययावत उपचारासाठी एकही रुग्णालय नाही. त्यामुळे आजही मोठ्या गुंतागुंतीच्या उपचारासाठी रुग्णांना मुंबई गाठावी लागते. मुंबईसारख्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसल्याने तसेच आर्थिकदृष्ट्या सोयीचे नसल्याने अनेक गरजू रुग्ण तिकडे पोहोचू शकत नाहीत, त्यातच वाढत्या रहदारीमुळे कित्येक रुग्ण वेळेत न पोहोचल्याने प्रसंगी दगावतात. मुंबई महानगर पालिकेत पालिकेची स्वतःची अनेक रुग्णालये असूनदेखील कोविड काळात प्रसंगानुरूप तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील खासगी रुग्णालयात ८० टक्के खाटा राखीव ठेवण्यासाठी आदेश दिलेले होते. आजही (१० टक्के खाटा राखीव) अशी पद्धत तेथील खासगी रुग्णालयात सुरू आहे, ज्याचे मी आपणास नमुनादाखल पत्र सोबत जोडले आहे. याच धर्तीवर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील गरीब गरजू नागरिकांसाठी हा मार्ग स्वीकारावा, ही विनंती त्यांनी पत्रात शेवटी आयुक्तांना केलेली आहे.
खर्चासाठी नवा लेखाशीर्ष करावा
आपल्या क्षेत्रात आपले स्वतःचे अद्ययावत रुग्णालय नसल्याने आपण निदान आपल्याकडे असलेल्या खासगी रुग्णालयात खाटा, तर नक्कीच आरक्षित ठेवू शकतो तसेच त्याचे दरही आपण कायम करू शकतो. ज्यामुळे आपल्या गरीब रुग्णांना दिलासा मिळेल. अंदाजे ३२०० कोटींच्या अर्थसंकल्पात आपण अंदाजे ११० कोटी वैद्यकीय सेवा म्हणून तरतूद करतो. आपण नागरिकांच्या आरोग्यास गरजेचा वरील प्रस्ताव मंजूर तर करावाच, शिवाय त्याच्या खर्चासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात एक नवा लेखाशीर्षदेखील तयार करावा, अशी मागणी किरण चेंदवणकर यांनी पत्राद्वारे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.