भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : दरवर्षी वीजदरात वाढ करावी, यासाठी राज्य विद्युत महावितरण कंपनीने अलीकडेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. या अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी वीजबिलात वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वीज ग्राहकांकडून सूचना आणि तक्रारी मागवण्यात आल्या आहेत. यावर ग्राहकांसह यंत्रमाग संघटनांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. तसेच भिवंडी पॉवरलूम मजुरी बीम विव्हर्स ॲण्ड ओनर्स असोसिएशनने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सचिवास पत्र लिहून आक्षेप व्यक्त केला आहे.
महावितरण कंपनीचे औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती आणि कृषी पंपांसाठीचे वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. सध्याचे उच्च दर असतानाही नवीन वाढीव वीजबिल भरणे शक्य होणार नाही. सध्याच्या वीज दराच्या तुलनेत प्रस्तावित दर राज्याच्या ग्राहकांवर गंभीर परिणाम करणारे आहे. वीज ग्राहकांवर त्याचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ही याचिका स्वीकारल्यास राज्यातील यंत्रमाग उद्योग आणि इतर उद्योगांना मंदीच्या छायेत ढकलण्याचे काम करेल. उत्पादनाच्या दरात वाढ झाल्याने येथील व्यापारी राज्याबाहेरील व्यवसायाशी स्पर्धा करू शकणार नाही. त्यामुळे नियामक आयोगाने व वीज वितरण कंपनीने दरवाढ करण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची विनंती असोसिएशनच्या वतीने आयोगाच्या व कंपनीच्या सचिवांना केली आहे.
काही वर्षांपासून यंत्रमाग उद्योग तोट्यात चालला आहे. आगामी वीज दरवाढ येथील यंत्रमाग धारक व मालक सहन करू शकणार नाही. आयोगाकडे सादर प्रस्तावानुसार भविष्यात २०२८-२९ आणि २०२९-३० मध्ये वीज दर कमी दाखवले जाण्याची शक्यता नाही. वाढलेले वीजदर कधीच कमी झालेले नाहीत. त्यामुळे भविष्यात विजेचे दर कमी करणे शक्य नाही, असे असोसिएशनने पत्रात नमूद केले आहे.
भिवंडीतील यंत्रमाग राज्याबाहेर
गेल्या वर्षी आयोगाने २०२३-२०२४ आणि २०२४-२०२५ या दोन वर्षांसाठी वीजदरात वाढ केल्याने गेल्या दोन वर्षांत भिवंडीमधील काही भागांतील यंत्रमाग राज्याबाहेर गेले. तर काही यंत्रमाग विकले गेले आहेत. महाराष्ट्रात उत्पादन खर्च जास्त आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय बाजारपेठेत टिकू शकत नाही. यामुळेच यंत्रमागासह इतर लघु उद्योग अन्य राज्यांमध्ये जात आहेत.
राज्यात टाटा पॉवर कंपनी, अदानी पॉवर कंपनी, मुंबईची बेस्ट पॉवर कंपनी, टोरंट पॉवर कंपनीसारख्या खासगी कंपन्यांना फायदा होत आहे. फक्त महावितरण कंपनी तोट्यात चालली आहे. याचा सरकारने शोध घेऊन उपाययोजना केली पाहिजे. महावितरणची अकार्यक्षमता, निष्काळजीपणा, वीज गळती, वीज चोरी आणि भ्रष्टाचार यामुळे तोटा होत आहे.
- तिरुपती सिरीपुरम, अध्यक्ष, भिवंडी पॉवरलूम मजूरी बीम विव्हर्स अँड ओनर्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.