काँग्रेसचे भ्रष्टाचारविरोधात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पाच वर्षांपासून लांबणीवर टाकल्या जात आहेत. यामुळे नागरी समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्याबरोबरच प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात मंगळवारी (ता. ४) कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पालिका मुख्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महापालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. त्यानंतर निवडलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपूनही आता पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. परिणामी, शहरात स्वच्छता, आरोग्य, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे आणि शिक्षणाच्या समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्या आहेत, असे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने ६५ अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू केली आहे; मात्र यामध्ये सामान्य नागरिक विनाकारण भरडले जात आहेत, असा आरोपही पोटे यांनी केला. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शेकडो लोकांचे संसार रस्त्यावर आले आहेत; मात्र प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी अजूनही सत्तेच्या संरक्षणाखाली कार्यरत आहेत, असे ते म्हणाले.
शहरातील नागरी समस्यांची जबाबदारी स्वीकारत केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी न घालता त्यांना त्वरित घरचा रस्ता दाखवावा, अशी भूमिका काँग्रेसने या वेळी स्पष्ट केली. धरणे आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, वरिष्ठ नेते राजाभाऊ पातकर, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, माजी नगरसेवक नविन सिंग यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.