मुंब्य्रातील भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशनला
ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेत प्रस्तावाला मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : कळवा, मुंब्रा, शिळ यासह आजूबाजूच्या परिसरातील क्रिकेट खेळात करिअर करायचे आहे. अशा खेळाडूंना प्रशिक्षणासाठी मुंबईत जावे लागायचे; मात्र अशा खेळाडूंना ठाण्यातच प्रशिक्षण घेता येणार आहे. मुंब्रा येथील मैदानासाठी आरक्षित असलेला भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेला १० वर्षांसाठी एक रुपया नाममात्र भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेने नुकतीच मान्यता दिली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण मिळावे. शहरात चांगले खेळाडू घडावेत, यासाठी पालिका प्रयत्न करत असते. तसेच खेळाडू घडविणाऱ्या संस्थांच्या मागणीनुसार पालिका मैदान नाममात्र दराने देत असते. त्यानुसार मुंब्रा येथे सर्व्हे क्रमांक ४८ पैकी, ४९ पैकी, ५० अ पैकी, ११९ अ पैकी, १२१ पैकी हा भूखंड मनोरंजन व मैदानासाठी आरक्षित आहे. हा भूखंड दीर्घ मुदतीसाठी भाडेपट्टावर देण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेने ठाणे महापालिकेकडे विनंती केली होती. या विनंतीनुसार ही जागा त्यांना देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे हे प्रयोजन ठाणे, मुंब्रा-शिळ-कौसा येथील खेळाडूंना फायदेशीर ठरेल. तसेच हा उपक्रम ठाण्यात सुरू झाल्यास खेळाडूंना मुंबई येथे जावे लागणार नाही. त्यांचा प्रवास व वेळ वाचेल. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनला जागा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रस्तावात स्पष्ट केले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन ही संस्था ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर हा प्रकल्प राबविणार आहे. कोणतेही शुल्क न आकारता ठाणेकरांसाठी सुविधा उपलब्ध करणार आहेत. तसेच या जागेची आणि त्यामधील प्रकल्पाची निगा देखभाल, इतर सर्व खर्चही संस्था करणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही, असेही पालिकेने प्रस्तावात स्पष्ट केले आहे.
२० खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण
ठाणे महानगरपालिकेने क्रीडा प्रयोजनासाठी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथील वाणिज्य गाळे विविध खेळ संघटनांना एक रुपये मासिक भाडे आकारून दीर्घ कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्याच धर्तीवर मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेला मुंब्रा येथील मैदानासाठी आरक्षित असलेला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ च्या अधिसूचनेमधील अटी व शर्तीनुसार महापालिका स्वतःची मालमत्ता प्रथमतः १० वर्षांपर्यंत भाडेपट्टाधारकास मासिक भाडे आकारून देणार आहे. तसेच संस्थेची समाधानकारक कामगिरी विचारात घेत उर्वरित पाच वर्षांसाठी कालावधी वाढवून देण्यात येणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या शाळांमधील शिफारस केलेल्या इच्छुक २० खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण देणे, संस्थेस बंधनकारक राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.